शिवसेना - भाजप युतीची शक्‍यता धुसर

महेश पांचाळ
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई : राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेला सोबत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात समन्वयाची किनार दिसत असली तरी आगमी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपत युती होण्याची शक्‍यता नसल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आतापासून आघाडी घेतली आहे.

मुंबई : राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेला सोबत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात समन्वयाची किनार दिसत असली तरी आगमी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपत युती होण्याची शक्‍यता नसल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आतापासून आघाडी घेतली आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल (सोमवारी) झाले. निवडणुका तोंडावर आल्या असताना फडणवीस आणि ठाकरे हे गेल्या दीड महिन्यात महापालिकेच्या कार्यक्रमानिमित्त तिसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यात नागपूर अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात ठाकरे हे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या वेब पोर्टलबाबतची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. या वेबपोर्टलमुळे प्रशासनाकडे आलेल्या कागदपत्रांची सहीनिशी माहिती उपलब्ध होणार आहे. या आयुक्तांच्या या माहितीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

काव काव करणारे आजूबाजूला आहेत पण डोळे उघडून वेबपोर्टल पाहिली तर महापालिकेच्या स्वच्छ कारभाराची प्रचिती येईल. मुंबई महापालिका ही स्वच्छ कारभार देणारी देशांतील एकमेव महापालिका आहे. मात्र काही लोक संशय घेतात आणि त्यांची टीकेची काव काव चालू असते असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. दरम्यान या कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेत कोणतीही टीकाटिप्पणी करण्याचे टाळले. प्रशासनावर अकुंश असेल तर कारभार सुरळीत पार पडतो. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या वेबपोर्टलमुळे आता महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता येईल असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेत शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी देऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या परस्परांमध्ये कटूता असल्याने आगामी निवडणुकीत युती होण्याची शक्‍यता कमी असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

Web Title: no possibility of sena bjp alliance