अहमदाबादेत कुणालाही भेटलो नाही - राणे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - ""भाजपकडून प्रवेशाची ऑफर आहे; पण त्यांना मी होही म्हटलेले नाही आणि नाहीही म्हटलेले नाही. सिंधुदुर्गात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कामासाठी अहमदाबादला गेलो होतो, तिथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नाही,'' असा खुलासा कॉंग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी, ""पक्षातील काही बाबींवर चर्चा करण्यासाठी शहांची भेट घेतली; मात्र त्या वेळी राणे उपस्थित नव्हते,'' असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. 

राणे यांनी काल रात्री अहमदाबादला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची फडणवीस यांच्या उपस्थितीत भेट घेतल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दाखविले. राणे व फडणवीस एकाच मोटारीत जात असल्याची दृश्‍येही माध्यमांनी दाखविली. त्यामुळे खळबळ उडाली होती. राणे यांनी आज या सर्व गोष्टींचा पत्रकार परिषदेत इन्कार केला. 

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपप्रवेशाच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेला कॉंग्रेसमधील पदाचा राजीनामा, आमदारपुत्र नीतेश यांनी आम्हाला गृहीत धरू नका, अशा आशयाचे केलेले ट्‌विट यामुळे राणे आता कॉंग्रेसलाही जय महाराष्ट्र करण्याच्या बेतात असल्याचे मानले जाते. राणेंनी अमित शहा यांची भेट घेतल्यासंदर्भातील बातम्या माध्यमांनी दाखवण्यास प्रारंभ करताच, राणे यांनी लगेचच वार्ताहरांना बोलावून घेतले. नीतेश राणे यांनीही आम्ही कोणतीही लपवाछपवी करत नाही, भेट लपवून ठेवण्याचे कारणच नाही, असे ट्‌विट केले. राणे म्हणाले, ""मी गेल्या महिन्यात दोनदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर विमानप्रवास केला. एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या विवाहाला, तर त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कन्येच्या विवाह समारंभाला मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. पण अहमदाबादेत मुख्यमंत्र्यांना किंवा शहा यांना भेटलेलो नाही.'' 

रुग्णालयासाठी साहित्य खरेदी आपण अहमदाबादला करता काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""तेथे कन्सल्टंट आहे,'' असे उत्तर दिले. ""राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यांच्यासमोर सर्व मुद्दे मांडले. मात्र त्याच्यावर अजून काही कार्यवाही झालेली नाही. कॉंग्रेस नेत्यांनीही मी राहुल गांधी यांच्याशी काय बोललो याची चौकशी केली नाही,'' असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात राणेंनी स्पष्ट केले. 

""भाजपने आपल्याला या अगोदरच ऑफर दिली आहे. भविष्यात या ऑफरचा किंवा शिवसेनेत परत जाण्याचा विचारच करणार नाही, असे सांगता येणार नाही,'' असेही नमूद करत त्यांनी भाजपप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देणे टाळले. पत्रकार परिषदेनंतर दुपारी मुंबईहून राणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी सिंधुदुर्ग गाठल्याने भाजपप्रवेशाच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. 

Web Title: Nobody meet the Ahmedabad - rane