शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रखडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये तीन समित्यांकडून दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा आकृतिबंध मंजूरही करण्यात आला. मात्र, वित्त विभागाची त्याला अद्यापही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला हिरवा कंदील न मिळाल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये तीन समित्यांकडून दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा आकृतिबंध मंजूरही करण्यात आला. मात्र, वित्त विभागाची त्याला अद्यापही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला हिरवा कंदील न मिळाल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे. परिणामी, अनेक शाळांमध्ये ही पदे रिक्त आहे. या पदांची भरती व्हावी, यासाठी वेळोवेळी संघटनांनी आंदोलनेही केली. मात्र, त्याची म्हणावी तशी दाखल सरकारने अद्यापही घेतली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आकृतिबंधाला मान्यता मिळाल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याची घोषणाही काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १७ हजार २५५ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणे अपेक्षित असताना अद्यापही तसे झाले नाही.

राज्यातील शिक्षक, पदवीधर आमदारांनी शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. या वेळी राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर आणि प्रसन्न कोतुळकर उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर २०१३च्या सुधारित आकृतिबंधातील त्रुटीबाबत फेब्रुवारी २०१५मध्ये समिती नेमण्यात आली. या समितीने जुलै २०१५मध्ये अहवाल सादर केला. मात्र, त्यानंतरही अद्यापपर्यंत भरतीप्रक्रिया रखडल्याने संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

उच्चतर समितीने केलेल्या शिफारशीनुसारच आकृतिबंध निश्‍चित होईल. आकृतिबंध वित्त विभागाकडे पाठवला आहे. मंजुरी अंतिम टप्प्यात असून, अध्यादेश काढण्याच्या प्रतीक्षेत आहे.
- चारुशीला चौधरी, उपसचिव, शिक्षण विभाग

पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कनिष्ठ लिपिक, एक हजार आणि त्यापुढील विद्यार्थी संख्येसाठी एक वरिष्ठ आणि दोन कनिष्ठ लिपिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसाठी एक पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय असल्यास एक अतिरिक्त पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक, सातशे आणि त्यापुढे विद्यार्थ्यांसाठी एक पूर्णवेळ ग्रंथपाल, एका शाळेसाठी किमान तीन शिपाई असावा, असे या आकृतिबंधात प्रस्तावित आहे. त्याप्रमाणे जागांची भरती होणे अपेक्षित आहे. आकृतिबंध समितीने केलेल्या शिफारशीनुसार मंजूर व्हावा.
- शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ

Web Title: Non-teaching employees recruitment