मानेवर डोके आहे ना? उत्सव होणारच!- सेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑगस्ट 2016

मुंबई - "गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार‘ करणाऱ्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल‘, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

न्यायालय सरकारच्या भूमिकेत शिरत असल्याची टीका करत अग्रलेखात म्हटले आहे की, "निवडणुका वगैरे रीतसर होऊन लोकनियुक्त सरकार कारभार हाकत असले तरी खरा राज्यकारभार न्यायालयेच करीत आहेत. अर्थात, सरकारच्या भूमिकेत न्यायालये शिरतात तेव्हा राजकीय चिखलफेकीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी नक्कीच ठेवायला हवी; कारण जे निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे त्या सर्व निर्णयांत न्यायव्यवस्था हस्तक्षेप करू लागली आहे.‘

‘दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, ही चिथावणी वगैरे न समजता लोकांच्या मनातील खदखद समजून सावध व्हावे, असा विनम्र इशारा देण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत‘, असे अग्रलेखात म्हटले आहे.

"इमारती कोसळत आहेत. पूल पडत आहेत. भ्रष्टाचार व अतिरेक्‍यांची खुनी होळी सुरूच आहे. जन्मठेप व फाशीसारख्या शिक्षा असूनही निर्घृण गुन्हे होण्याचे थांबत नाही व टेबलावर "ऑर्डर ऑर्डर‘ असे आपटून हातोडे झिजले तरी गुन्हेगारांचे आक्रमण थांबत नाही. प्रत्यक्ष न्यायालयात उंबरठे झिजवून तरी खरा न्याय मिळतोय का, हा सवालच आहे!‘, असेही अग्रलेखात पुढे म्हटले आहे. तसेच गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा "राज्यकारभार‘ करणाऱ्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असे आवाहनही अग्रलेखातून करण्यात आले आहे.

Web Title: Is not considered to be the head? Be a celebration! - shivsena