भाजपचा चेहरा मोदी नव्हे फडणवीसच!

भाजपचा चेहरा मोदी नव्हे फडणवीसच!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांचाच चेहरा पुढे केला होता. मात्र, आता राज्याची सर्व सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक चेहरा म्हणून भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पुढे करण्यात आले आहे. संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली असून, होर्डिंग्जवरही त्यांचा चेहरा ठळकपणे दिसत आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुंबईभर लावलेल्या होर्डिंग्जमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची छबी झळकत आहे. त्यांच्या नावानेच मतांचा जोगवा मागितला जात असल्याची चर्चा रंगली आहे.


महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना-भाजपने प्रचाराची राळ उडवली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने प्रचारसभांचा झंझावात सुरू केला आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांसाठी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे केला आहे. शिवसेनेने शहरभरात लावलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा झळकत आहे. त्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपने मात्र होर्डिंग्जवर मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे आणला आहे.


भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवतो. मोदी यांच्याशिवाय भाजपकडे देशभरात कोणताही चेहरा नाही, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारातही मोदींना उतरवले जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात शिवसेनेकडे बाळासाहेबांव्यतिरिक्त दुसरा चेहराच नसल्याची चर्चा मुंबईभर सुरू आहे.


भाजपकडे मोदींव्यतिरिक्त ओळख नसल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेकडे बाळासाहेबांखेरीज विश्‍वासार्ह चेहरा नसल्याची चर्चा सध्या निवडणूक धामधुमीत रंगली आहे. भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेनेला बाळासाहेबांशिवाय पर्याय नसल्याचे होर्डिंगबाजीतून स्पष्टपणे जाणवते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com