
Sharad Pawar: "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल...",शरद पवारांबद्दल पसरलेल्या बातमीवरून राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी नामांतराला विरोध केल्याचं सांगत मी संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार, असं वक्तव्य केल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र शरद पवार यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.(Latest Marathi News)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यासंदर्भात ट्वीट करत शरद पवारांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच हे वृत्त देणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. 'छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. एका वृत्तवाहिनीने याबाबत खोडसाळपणा केला आहे. या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत,' असं ट्वीट सूरज चव्हाण यांनी केलं आहे.(Latest Marathi News)
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? भाजपचा सवाल
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? अशा सवाल भाजपने ट्विट करत राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे. तसेच एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे.मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? अशा आशयाचे ट्विट भाजपने केला आहे.(Latest Marathi News)
शरद पवार नक्की काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यासोबतचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की, 'काल जाफराबादवरून येताना एक सहकारी म्हणाला की मला समृद्धी महामार्ग बघायचा आहे. त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो.' दरम्यान आपल्याकडून बोलण्याच्या ओघात शहराचा उल्लेख औरंगाबाद झाला असल्याचं लक्षात येताच पवार यांनी स्वत:ला दुरुस्त केलं आणि संभाजीनगर म्हणत मला वाद वाढवायचा नसल्याचंही सांगितलं होतं.(Latest Marathi News)