नोटाच्या तंगीत देशी दारू "चढली' 

नोटाच्या तंगीत देशी दारू "चढली' 

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मद्य उत्पादकांना चांगलाच बसला आहे. दहा दिवसांत बिअरची विक्री 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. भारतीय बनावटीच्या मद्याचा खप 15 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. प्रत्येक जण पैसे पुरवून वापरण्याच्या प्रयत्नात असल्याने राज्यात मात्र विदेशी मद्याच्या तुलनेत स्वस्त असलेल्या देशी दारूच्या विक्रीत पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. परदेशी बनावटीच्या महागड्या मद्याकडेही अनेकांनी पाठ फिरवली आहे. मद्याच्या विक्रीत घट झाल्याने त्याचा फटका उत्पादन शुल्क विभागालाही बसणार असल्याचे समजते. 

जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी बॅंकांबाहेर नागरिक रांगा लावत आहेत. शंभराच्या नोटांच्या टंचाईमुळे घरचे बजेट कोलमडत आहे. मद्य उत्पादकांनाही फटका बसतो आहे. मद्याच्या विक्रीमुळे राज्य सरकारला वर्षाला कोट्यवधीचा महसूल मिळतो; पण बाजारात सुट्टे पैसे मिळत नसल्याने वॉईन शॉपवरील गर्दी कमी झाली आहे. दहा दिवसांत बिअरच्या विक्रीत 30 टक्के; तर भारतीय बनावटीच्या मद्यविक्रीत 15 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयाच्या दोन दिवसांनंतर वॉईन शॉपवर क्रेडिट कार्डवरून मद्य देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती; मात्र बॅंकांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचाही फटका विक्रीवर झाला. कार्ड स्वाईप होत नसल्याने परदेशी आणि भारतीय बनावटीच्या मद्याची विक्री झाली नसल्याचे एका मद्य उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. 

नोटांच्या टंचाईमुळे कित्येकांनी देशी दारूकडे मोर्चा वळवला आहे. देशी दारूच्या किमती परवडणाऱ्या असल्याने "जीएम'च्या संत्रा, लिंबू आणि पंच मद्यामध्ये मुंबई, ठाणे व मराठवाड्यात आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी गावठी दारू आणि बनावट ताडी-माडी विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. गावठी आणि ताडीमाडीऐवजी नागरिक देशी जीएम दारू पित असल्याचे चित्र आहे. बाजारात दोन हजारांच्या नोटा मिळू लागल्याने येत्या काही दिवसांत मद्याच्या विक्रीत वाढ होण्याची शक्‍यता उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

हेल्पलाईवर 759 तक्रारी 

बनावट मद्य आणि तस्करीबाबतच्या माहितीकरता उत्पादन शुल्क विभागाने 2 ऑक्‍टोबरपासून हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर आतापर्यंत 759 तक्रारी आल्याची नोंद आहे. त्यांपैकी 487 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकहून 57, मुंबई शहर 9 व उपनगरातून 21 तक्रारी आल्या होत्या. बहुतांश तक्रारी ताडी-माडी, गावठी दारू तस्करी, अवैध धाबे, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले वाईन शॉप आदींबाबतच्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com