खासगी रुग्णालयांमध्ये रद्द केलेल्या नोटा चालणार नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - चलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये चालतील. त्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये चालणार नाहीत, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. 

पुणे - चलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये चालतील. त्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये चालणार नाहीत, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. 

शहरातील रुग्णालयांनी जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकाराव्यात, असा नातेवाइकांचा अग्रह होता; पण चलनातून रद्द केलेल्या नोटा खासगी रुग्णालयांमध्ये फक्त 14 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या नोटा स्वीकाराव्या, असा कोणताही आदेश रुग्णालयांना कोणत्याच माध्यमातून मिळाला नाही. त्यामुळे या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय खासगी रुग्णालयांनी घेतला. त्यामुळे शहरातील रुग्णालये आणि बिल भरण्यासाठी रुग्णालयात आलेले रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर शिरोळे यांनी दास यांची भेट घेतली. त्याबद्दल बोलताना शिरोळे म्हणाले, ""सरकारी रुग्णालयांमध्ये जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण त्यात खासगी रुग्णालयांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्याच वेळी सरकारी रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी मात्र जुन्या नोटा चालतील.'' 

चलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा वगळता डेबिट, क्रेडिट, ऑनलाइन आणि धनादेश या माध्यमातून बिल स्वीकारण्यात येत आहे, अशी माहिती शहरातील रुग्णालयांतर्फे देण्यात आली. रुग्णालयाशी संलग्न औषध दुकाने याला अपवाद असतील. तेथे पाचशे-हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचेही रुग्णालयांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: notes will not be refunded in private hospital