पुणे विभागातील 17 दूध संघांना नोटीस

तात्या लांडगे
बुधवार, 25 एप्रिल 2018

सोलापूर - राज्य शासनाच्या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याच्या कारणाने पुणे विभागातील 17 सहकारी दूध संघांच्या अध्यक्षांसह संचालकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी "सकाळ'ला दिली.

सोलापूर - राज्य शासनाच्या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याच्या कारणाने पुणे विभागातील 17 सहकारी दूध संघांच्या अध्यक्षांसह संचालकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी "सकाळ'ला दिली.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 27 रुपयाचा दर द्यावा असा निर्णय शासनाने 19 जून 2017 रोजी जाहीर केला. परंतु, राज्यातील बहुतांशी दूध संघांकडून या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे या संघांना यापूर्वी 9 नोव्हेंबर 2017 रोजी नोटीस बजावण्यात आली.

त्यानंतर सरकारने दोन महिने कोणतीही कार्यवाही करू नये, असे निर्देश दिले. परंतु, दोन महिन्यानंतरही या सहकारी दूध संघांकडून शासन निर्णयानुसार दर दिला नाही. त्यामुळे त्यांना आता पुन्हा नोटीस देण्यात आल्याचे शिरापूरकर यांनी सांगितले.

पुणे विभागातील सोलापूरमधील एक, कोल्हापूरमधील दोन, साताऱ्यामधील पाच, तर सांगलीतील सात दूध संघांचा यात समावेश आहे.

सहकारी संघांबाबत येत्या 2 आणि 3 मे रोजी पुण्यातील विभागीय उपनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे.
-सुनील शिरापूरकर, उपनिबंधक, दुग्ध विभाग

दूध संघांनी दिलेला दर रुपयांत (कंसात विभाग)
19 - शिवामृत (सोलापूर)
25 - गोकूळ, शिरोळ (कोल्हापूर)
21.50 - पुणे (पुणे)
20.15 - बारामती ( पुणे)
23 - राजारामबापू, इस्लामपूर (सांगली)
22 - वसंतदादा पाटील संघ (तासगाव)
25 - फत्तेसिंह नाईक संघ (शिराळा)
23 - सोनहिरा कडेगाव व शेतकरी संघ (कवठेमंहाकाळ)
21 - लोकनेते हणमंतराव पाटील संघ (वीटा) व मोहनराव शिंदे (मिरज)
22 - सातारा तालुका संघ (सातारा )
21 - पाटण तालुका संघ (सातारा)
22 - शिवशंभू (सातारा)
20.80 - फलटण (सातारा)
22 - कोयना संघ (कऱ्हाड)

Web Title: notice to 17 milk organisation in pune section