त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस 

मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - विकास आराखड्यात हिरव्या पट्ट्यातील जमिनी पिवळ्या पट्ट्यात रूपांतरित करत त्यांचे मूल्य वाढविण्याच्या त्र्यंबकेश्‍वरमधील जमीन गैरव्यवहाराची जिल्हा यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. नगराध्यक्षा लढ्ढा यांनी, आपण कुठलेही चुकीचे कामकाज केलेले नाही. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा करणार असल्याचे "सकाळ'ला सांगितले. 

नगराध्यक्षांचे पती दीपक लढ्ढा यांच्या कामकाजातील हस्तक्षेपाबाबत मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 44 नुसार पालिका सदस्याच्या पतीने किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीने शासकीय कामात हस्तक्षेप करण्यास मनाई केलेली आहे. तेव्हा शासकीय कामात त्रयस्थ व्यक्ती, सदस्यांचे पती यांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध करावा. नगर परिषदेमार्फत न झालेल्या विकास आराखड्यातील ठरावावर कार्यवाही होऊ नये. नगराध्यक्षा प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रजेवर असताना शासकीय मुद्रणालयाला अहवाल प्रसिद्धीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी पत्र पाठविणे अपेक्षित असताना, नगराध्यक्षांनी पत्र पाठविले. त्यांचे हे वर्तन कायदे विसंगत असल्याने श्रीमती लढ्ढा यांच्याविरोधात अपात्रतेची कार्यवाही करावी, अशी शिफारस केली आहे. 

कोलंबिकादेवी, नगराध्यक्षांवर मेहेरनजर 
प्रारूप आराखडा तयार करताना नगराध्यक्षा, कोलंबिकादेवी संस्थानच्या हिरव्या पट्ट्यातील मोठ्या प्रमाणावरील जमिनी पिवळ्या पट्ट्यात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. नगर परिषदेतील 14 नगरसेवकांनी त्याविरोधात पत्र देत कोलंबिकादेवी व नगराध्यक्षांशी संबंधित ठरावावर पिवळ्या झोनमध्ये रूपांतरित करून मूल्य वाढविण्याच्या गैरव्यवहाराला घुसडल्याचे म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर प्रारूप प्रसिद्धीसाठी नगराध्यक्षा रजेवर असताना ठराव गेला कसा, असा मुद्दा उपस्थित केला आहे. नगराध्यक्ष व कोलंबिकादेवी संस्थानच्या जमिनी परस्पर हिरव्या पट्ट्यातून पिवळ्या पट्ट्यात रूपांतरित करण्याच्या या प्रयत्नावरून धुम्मस सुरू आहे. हिरव्या पट्ट्यातील डोंगराच्या जमिनींचा झोनबदल, सिंहस्थ झोनमध्ये ढवळाढवळ यांसह अनेक मुद्यांवर हे प्रकरण गाजत आहे. 

राजीनाम्यासाठी षडयंत्र 
दरम्यान, दीपक लढ्ढा यांनी याविषयी मौन सोडले. ते म्हणाले, की मुख्याधिकारी डॉ. केरूरे यांनी पत्नीच्या अपात्रतेसाठी केलेल्या शिफारशीचा विषय हेच राजकारण आहे. ज्याच्याशी माझा संबंध नाही. माझी पत्नी नगराध्यक्षा असून, नगर परिषदेच्या कामकाजासाठी त्या सक्षम आहेत. मी नगर परिषदेच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. पत्नी नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनीही कुठले चुकीचे काम केलेले नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायंकाळी उशिरा पत्र मिळाले. नगराध्यक्षा म्हणून मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. जिल्हाधिकारी साहेबांकडून आलेल्या पत्राबाबत त्यांच्याकडे खुलासा करणार आहे. 
- विजया लढ्ढा, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्‍वर