आता मी निवडणूक लढविणार नाही - सुरेश जैन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 मे 2017

जनतेने मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे, मात्र आता मी निवडणूक लढविणार नाही. माझी कोणतीही धास्ती घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे विद्यमान आमदारही सुरेश भोळे व्यासपीठावर उपस्थित होते.

जळगाव : जनतेने मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे, मात्र आता मी निवडणूक लढविणार नाही. माझी कोणतीही धास्ती घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे विद्यमान आमदारही सुरेश भोळे व्यासपीठावर उपस्थित होते.

जळगाव येथील बहिणाबाई उद्यानात लायन्स क्‍लबतर्फे खेळणी तसेच इतर साहित्य बसविण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे,चंदूभाई पटेल उपस्थित होते.

अध्यक्षपदावरून बोलताना जैन यांनी जळगाव शहराच्या विकासाबाबत चिंता व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, सर्वच पक्षाच्या आमदार, खासदारांनी त्यांचा विकासनिधी शहराच्या विकासासाठी दिला पाहिजे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून ते म्हणाले, आता माझी धास्ती बाळगायची गरज नाही, जनतेला मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे. या पुढे मी निवडणूक लढविणार नाही. मी तुमच्या समोर उमेदवार असणार नाही. त्यामुळे तुम्ही निधी आणून जळगावच्या विकासाकडे लक्ष द्या. जळगावचा विकास झाला पाहिजे. निवडणुका झाल्यानंतर पक्षीय मतभेद विसरून शहराच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छतेत देशात जळगावचा 162 वा क्रमांक आल्याचे आपल्याला वाईट वाटते यापेक्षा चांगला क्रमांक येण्याची गरज होती. असे मतही त्यांनी व्यक्त केले.

घरकुल गैरव्यवहाराच्या आरोपावरून सुरेशदादा जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी जाहीर कार्यक्रमात जाणे टाळले होते. जि.प,निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवारासाठी सभा घेतल्या परंतु पक्षीय वक्तव्य केले नाही. आज प्रथमच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत जाहीर वक्‍तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगावच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार हे निश्‍चित आहे.

जैन व राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे निकटचे संबंध आहेत. गेल्या आठवड्यात जामनेर येथे महाजन यांच्या निवासस्थानी जैन गेले होते त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. दुसरीकडे भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व मंत्री महाजन यांच्यात वाद वाढला आहे. जैन आणि खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील या राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

Web Title: Now i will not contest elections : Suresh Jain