आता 'लॉ'ची प्रश्नपत्रिकाही मराठीत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाचे शास्त्रोक्त शिक्षण आणि संशोधन करणाऱ्या विभागात एलएलएमसाठी 600 जागा उपलब्ध आहेत. विविध 6 समूहातील वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण या विभागामार्फत दिले जाते.

मुंबई : एल.एल.एम. प्रवेश परीक्षा आणि एल.एल.एम. पदव्युत्तर पदवी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या आज (शुक्रवार) झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर विधीच्या एलएलएम या दोन वर्षीय अभ्यासक्रमाला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीसह मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. 

पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाचे शास्त्रोक्त शिक्षण आणि संशोधन करणाऱ्या विभागात एलएलएमसाठी 600 जागा उपलब्ध आहेत. विविध 6 समूहातील वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण या विभागामार्फत दिले जाते. मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून एलएलएम प्रवेशप्रक्रिया आणि पदवी अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने अभ्यास मंडळाने सर्वानुमते ठराव संमत करून विद्या परिषदेला शिफारस केली होती. अभ्यास मंडळाने केलेल्या शिफारशीचा सकारात्मकपणे विचार करून विद्या परिषदेने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. विद्यार्थीकेंद्रित या निर्णयाचा मराठी भाषेतून पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the question paper of the law is in Marathi language