आता एमपीएससी परीक्षेसाठी अंगठाही द्यावा लागणार !

विकास गाढवे
शनिवार, 12 मे 2018

पोलिसांकडून डमी उमेदवार व अशा उमेदवारांना परीक्षेला बसवून सरकार दरबारी पदे मिळवणाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. यामुळे आयोगाने मागील महिन्यात 8 एप्रिल रोजी झालेल्‍या 
राज्य सेवा पूर्व परीक्षेपासूनच अनेक नवीन नियम लागू केले आहेत.

लातूर : तुम्ही कितीही शिकलात, अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देत असाल. तरीही तुम्हाला अशिक्षितासारखा अंगठा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने रविवारी (ता. 13) होणाऱ्या दुय्यम सेवा परीक्षेत उमेदवारांना अंगठे बहाद्दराची भूमिका बजावावी लागणार आहे. आयोगाच्या परीक्षांतील डमी उमेदवारांचे प्रकार रोखण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. मागील काही काळात डमी उमेदवार बसवून अनेकांनी आयोग तसेच अन्य परीक्षांंतून पदे मिळल्याच्या घटना उघड झाल्या. 

पोलिसांकडून डमी उमेदवार व अशा उमेदवारांना परीक्षेला बसवून सरकार दरबारी पदे मिळवणाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. यामुळे आयोगाने मागील महिन्यात 8 एप्रिल रोजी झालेल्‍या 
राज्य सेवा पूर्व परीक्षेपासूनच अनेक नवीन नियम लागू केले आहेत. यात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ओळखीचे दोन पुरावे बंधनकारक करण्यात आले असून परीक्षेला एक तास आधी केंद्रावर उपस्थित रहाणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासह परीक्षेत सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेवर नमूद करणेही अनिवार्य केले असून त्यासाठी जादा दोन मिनिटांचाही वेळ वाढवून दिला आहे. 

उत्तरपत्रिकेचा कार्बनलेस असलेला भाग दोन निकालाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांभाळून ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. यासाठी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नियमांची जंत्रीच एमपीएससीने दिली आहे. त्यात रविवारी होणाऱ्या परीक्षेपासूनच आणखी एक नवीन नियम वाढवला आहे. यात उमेदवारांना परीक्षेच्या हजेरीपटावर स्वाक्षरीसोबत डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसाही द्यावा लागणार आहे. यासोबत परीक्षा केंद्रावर दीड तास तर परीक्षा कक्षात एक तास आधी उपस्थित रहावे लागणार आहे. दुय्यम सेवा परीक्षेच्या प्रवेशपत्रावर आयोगाने या सुचना दिल्या आहेत. 

अंगठ्याला पर्याय नाही!

सरकारी दरबारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. मात्र, एखादी व्यक्ती तिच आहे, हे खात्रीपूर्वक समजून येण्यासाठी अंगठ्याचा ठशाला पर्याय नाही, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरीराच्या रचनेत एका व्यक्तीच्या बोटांचे ठसे दुसऱ्या व्यक्तींच्या ठशासोबत जुळत नाही. ऑनलाईन रजिस्ट्री, बायोमॅट्रिक हजेरी, गुन्हेगारांचा शोध असो की आधार नोंदणी असो. अंगठा व बोटांचे ठशेच उपयोगी ठरत आहेत.

Web Title: Now the thumb will be required for the MPSC examination