महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या वाढणार; नव्याने होणार निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शहरातील हॉटेल राधाकृष्णमध्ये मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की येत्या काळात भुसावळ हमखास जिल्हा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. या वक्तव्याचे संपूर्ण परिसरामधून स्वागत होत आहे. संभाव्य जिल्ह्यात भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर अशा सहा तालुक्यांचा समावेश असणार आहे. ते पुढे म्हणाले, की शहरातील एमआयडीसीबाबत ठोस निर्णय सरकार लवकरच घेईल. भुसावळ-जळगावसाठी लक्ष घालणार, असे आश्‍वासन दिले.

तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्याबाबत सरकारवर टीका केल्याची व विमा कंपन्यांचे अधिक भले झाले याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी पाच वर्षांत दोन हजार १६१ कोटी भरले. मात्र, त्यांना १४ हजार ९४० रुपये कोटींचा परतावा मिळाला. जर कोणी सुटले असेल, तर निश्‍चित त्यांना लाभ देऊ, असेही ते म्हणाले. 

आमदार खडसेंचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे 

आमदार एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबद्दल विचारणा केली असता, मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे, राज्यात घ्यायचे की केंद्रात घ्यायचे, याचा निर्णय मी घेत नाही, तर पक्षातील वरिष्ठ नेते घेत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, आमदार खडसे आमचे ज्येष्ठ नेते असून, ते मार्गदर्शकही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of districts will increase in Maharashtra