मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी महाराष्ट्राला कोट्यवधींचा धनलाभ

टीम ई-सकाळ
मंगळवार, 23 जुलै 2019

- मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते आवाहन.

- त्यानुसार जमा झाला तब्बल पावणे दोन कोटींचा निधी.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल (ता.22) वाढदिवस सोहळा पार पडला. या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत 'मुख्यमंत्री सहायता निधी'त सुमारे पावणे दोन कोटींचा निधी जमा झाला आहे. याबाबतचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले.

या ट्विटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे! माझा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देत गरिबांच्या उपचारासाठी हातभार लावावा, या माझ्या आवाहनाचा सन्मान राखल्याबद्दल सुद्धा मी सर्वांचा आभारी आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि त्यांच्या आप्तेष्टांना केले होते. या आवाहनानुसार त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा केला गेला नाही. वाढदिवस साजरा न करता केला जाणारा खर्च मुख्यमंत्री साहायता निधीत जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीत एक कोटी 75 लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Occasion of Devendra Fadnavis birthday Collects One Crore and 75 Thousand Rupees