esakal | रा. स्व. संघाविरोधात आक्षेपार्ह लिखाण; धोटेंना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

रा. स्व. संघाविरोधात आक्षेपार्ह लिखाण; धोटेंना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणारे ओबीसी नेते बळीराज धोटे यांना रविवारी (ता. 25) पहाटे पाच वाजता शिवाजीनगर येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर भादंवि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोटे यांच्या लिखाणाची तक्रार भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख राहुल लांजेवार यांनी शहरातील दोन पोलिस ठाण्यात केली होती.
शहीद भगतसिंग यांच्याविरोधात इंग्रजांच्या बाजूने खटला लढवणारे सूर्यनारायण शर्मा हे रा. स्व. संघाचे सदस्य होते, अशा आशयाचा मजकूर धोटे यांनी सोशल मीडियावर टाकला होता. याच लिखाणाविरोधात लांजेवार यांची पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी धोटे यांना अटक केल्यानंतर आधी रामनगर आणि नंतर शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तोपर्यंत धोटे समर्थकांची गर्दी ठाण्यात उसळली. यात भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता.
शनिवारी रात्री तक्रार झाली आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावात पोलिसांनी पाच तासांच्या आत धोटेंना अटक केली, असा आरोप धोटे समर्थकांनी केला. त्यांनी ठाण्याच्या परिसरातच निषेध सभाही घेतली. यावेळी धोटे समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. दुसरीकडे भाजपच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी धोटेंचा पुतळा जाळून निषेध केला. धोटे यांच्या विरोधात जिल्ह्यातील सावली, धाबा आणि मूल येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, गुन्हा दाखल झालेला नाही.
धोटेंना दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी दंगानियंत्रण पथक बोलावले होते. न्यायालयाने धोटे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. धोटे समर्थकांनी अटकेच्या निषेधार्थ पुढील रणनीती ठरविण्यासाठी सायंकाळी एका बैठकीचे आयोजन केले. विशेष म्हणजे, धोटे पूर्वी संघाचे स्वयंसेवक होते. भाजपचेही कार्यकर्ते होते. मात्र, मतभेद झाल्यामुळे मागील वीस वर्षांपासून ते बहुजनवादी चळवळीत काम करीत आहेत.

ही दडपशाही : कोळसे पाटील
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी आज एका वेगळ्या मुद्यावर नागपुरात पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी धोटे यांच्या अटकेचा निषेध केला. धोटे यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये सत्यता आहे. त्यात तक्रारीचा विषय नाही आणि कुणाची बदनामी होत असेल तर मानहानीचा दावा करावा. हा एक प्रकारे दडपशाहीचा प्रकार आहे. उद्या मोदी, शहा माझ्यावरही कारवाई करू शकतात, असे कोळसे-पाटील म्हणाले.

loading image
go to top