शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑफलाइन बदल्यात "झेडपी'च्या पुढाऱ्यांना येणार भाव

संतोष सिरसट 
गुरुवार, 16 जुलै 2020

तालुकास्तरावर नेमा वेगवेगळी पथके 
ऑफलाइन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तालुकास्तरावर वेगवेगळी पथके नियुक्त करण्याचा सल्ला ग्रामविकास विभागाने दिला आहे. त्या पथकांच्या माध्यमातून बदल्यांचे अर्ज स्वीकारायचे आहेत. अर्ज घेताना सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्‍यक असल्याचेही ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

सोलापूर ः राज्यातील तीन ते चार लाख प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाच्या वर्षी ऑफलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या बदल्या करताना फेब्रुवारी 2017 च्या शान निर्णयाची अंमलबवाजमी करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर स्थानिक शिक्षक प्रतिनिधी संघटना व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा अशा सूचनाही ग्रामविकास विभाने दिल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात कमी करण्यात आलेला पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यानिमित्ताने वाढणार आहे. 

मागील पाच वर्ष राज्यात युतीचे सरकार आले होते. तेव्हापासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्याची पद्धत रुढ झाली होती. सुरवातीच्या काळात अनेक शिक्षक संघटनांनी याला जोरदार विरोध केला होता. काही संघटना न्यायालयातही गेल्या होत्या. मात्र, सरकारने ऑनलाइन बदल्या करण्याची आपली भूमिका कायम ठेवली होती. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांचा हस्तक्षेप या बदल्यांमध्ये दिसलाच नाही. शिक्षकांच्या मर्जीनुसार या बदल्या होत होत्या. मात्र, आता कोरोनाचे कारण देत ग्रामविकास विभागाने जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना देताना स्थानिक शिक्षक संघटना प्रतिनिधी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचा जीव पुन्हा टांगणीला लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

राज्यातील प्राथमिक शिक्षक हा बदल्यांना खूप घाबरतो. त्यामुळे पुढाऱ्यांशी सख्य ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न शिक्षकांकडून केला जात होता. या सगळ्या प्रक्रियेला फाटा देण्याचे काम मागील सरकारने केले होते. मात्र, यंदाच्या वर्षापासून पुन्हा शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकूण शिक्षक कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के बदल्या या 31 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी पुढील 13 दिवसात बदल्यांची ही प्रक्रिया जिल्हा परिषदांना पार पाडावी लागणार आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offline transfers within teachers' districts will cost ZP leaders