गणितात गोंधळ नको; जुनीच पद्धत योग्य

सुशांत सांगवे
बुधवार, 19 जून 2019

संख्या वाचनाची जुनी आणि नवी अशा दोन्ही पद्धती एकावेळी अवलंबल्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणतीतरी एक पद्धती पाठ्यपुस्तकात स्वीकारायला हवी होती. वास्तविक, संख्या वाचनाची जुनी पद्धतच अधिक योग्य आहे, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ञांनी बुधवारी व्यक्त केले.

लातूर : संख्या वाचनाची जुनी आणि नवी अशा दोन्ही पद्धती एकावेळी अवलंबल्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणतीतरी एक पद्धती पाठ्यपुस्तकात स्वीकारायला हवी होती. वास्तविक, संख्या वाचनाची जुनी पद्धतच अधिक योग्य आहे, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ञांनी बुधवारी व्यक्त केले.

दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून ‘बालभारती’ने गणिताच्या पुस्तकात प्रथमच जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा अवलंब केला आहे. या बदलांवर आधारित ‘त्र्याहत्तर ऐवजी आता सत्तर तीन’ असे वृत्त सर्वप्रथम ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी ‘बालभारती’ने केलेल्या या बदलांना विरोध दर्शवायला सुरवात केली आहे. हे बदल मराठी भाषेसाठी मारक आहेत, अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. तशीच नाराजी लातूरातील शिक्षणतज्ञांमधूनही व्यक्त होत अाहे.

शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनात आपण त्र्यान्नव, बासस्ट, नव्यान्नव, त्र्याहत्तर हेच शब्द वापरणार आहोत. हे शब्द ग्रामीण भागात, अशिक्षित लोकांनासुद्धा माहिती आहेत. त्यामुळे बाहेर एक आणि पुस्तकात दुसरेच, अशी स्थिती निर्माण होणार आहे. अनावश्‍यक गोंधळाची स्थिती टाळायची असेल तर पूर्वीची पद्धतच योग्य आहे. गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज नेमकी आत्ताच का भासली, हा माझा मुख्य प्रश्‍न आहे. अशा प्रकारचे मुलभूत बदल करताना ‘असे बदल आम्ही करणार आहोत’, हे आधीच जाहीर करायला हवे. त्याचा नक्कीच फायदा होतो.’’ 

गणित या विषयात आकलन क्षमता आणि उपयोजन क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी जुनी पद्धतच योग्य आहे. नव्या पद्धतीमुळे मुलांच्या आणि शिक्षकांच्या मनातही  गोंधळ निर्माण होण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात काही लेखकांनी मांडलेली भूमिका मला योग्य वाटते. 
- डॉ. नागोराव कुंभार, शिक्षणतज्ञ 

लेखक म्हणताहेत...!
जोडाक्षरे कठिण असतात, हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे; पण तसे सांगून सोपेपणाच्या नावाखाली मराठीच नष्ट करण्याचा प्रकार सुरू आहे. हा बदल म्हणजे सरळ सरळ मराठीचे इंग्रजीकरण आहे. यामागे इंग्रजी लॉबीचे कारस्थान दिसत आहे, अशी टीका साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली. तर वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले,  ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाेबाची मराठी संपवू नका. या बदलांबाबत अभ्यासकांनी पून्हा नीट विचार करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old method of math is perfect dont change it