
Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू होणार? ; कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर असलेल्या सरकारी कर्मचारी संघटनेने आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर युनियनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात कर्मचारी संघटनेची बैठक बोलावली होती. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परतणार आहे.
आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवेदन वाचून दाखवले. एकनाथ शिंदे म्हणाले, आज माझ्या समवेत संबंधित संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.