ज्येष्ठांना मोफत प्रवासाची जाहिरात बनावट - एसटी महामंडळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

समाजमाध्यमांवर फिरणारी जाहिरात अपप्रचार करणारी आणि असत्य आहे. एसटीच्या लाभार्थींनी अशा जाहिरातींवर विश्‍वास ठेवू नये.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक, एसटी महामंडळ

मुंबई - ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून चार हजार किलोमीटर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याची खोटी जाहिरात समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, ही जाहिरात खोटी असल्याचा खुलासा महामंडळाने केला आहे.

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. त्यासाठी राज्य सरकार महामंडळाला परतावा देते. एसटी महामंडळातर्फे प्रवाशांसाठी अशा 29 प्रकारच्या सवलत योजना राबवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना साध्या एसटीसाठी 50 टक्के, आसन व्यवस्था असलेल्या शिवशाही बससाठी 45 टक्के आणि शयनयान शिवशाहीसाठी 30 टक्के सवलत दिली जाते. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या बोगस जाहिरातीत मात्र ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून चार हजार किलोमीटरचा प्रवास मोफत करता येईल, असे म्हटले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे आहेत. या सवलतीसाठी नजीकच्या आगारात जाऊन स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही जाहिरात खोटी असल्याचा खुलासा तेथे एसटी कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old People Free Journey Advertise Bogus ST Corporation