दीड लाख जणांना सुरक्षितस्थळी हलविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून, स्थानिक प्रशासनासह लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरू आहे. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अन्य काही गावांमधील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही मार्ग आणि पूल पाण्याखाली गेल्याने मदत आणि बचावकार्यास अडचणी येत आहेत.  (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा )कृष्णा नदीत तीन लाख ६२ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू असून, अलमट्टी धरणातून चार लाख क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. तो साडेचार लाख क्‍युसेक करावा, अशी विनंती राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे केली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, पाण्यात उतरू नये, सेल्फी घेण्याचे टाळावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

सर्वांनाच सुरक्षितस्थळी हलविणे अशक्‍य
पूल आणि रस्ते पाण्याखाली आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार ५१४ नागरिक, सातारा जिल्ह्यात सहा गावांमधील आठशे आणि सांगली जिल्ह्यातील १८ गावांमधील ४९ हजार नागरिक गावात अडकून पडले आहेत. त्यांना लगेचच बोटीने सुरक्षितस्थळी हलविणे अशक्‍य आहे. त्यांना गावातच उंच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुरामुळे ७ हजार नागरिकांचे स्थलांतर 
पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपूर तालुक्‍यातील नदीकाठच्या ३० गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून, या सर्व गावांमध्ये पाणी शिरले आहे. या गावांतील सात हजार २२१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्त कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी बुधवारी ‘सकाळ’शी बोलताना दिली. पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. येथील पावसाच्या पाण्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यातून आलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणही आज १०० टक्के भरले. उजनी धरणातून आज दुपारी एक वाजता एक लाख २० हजार; तर वीर धरणातून नीरा नदीत ९४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्‍यातील नदीकाठच्या एकूण ४० गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्‍यातील नदीकाठच्या ३० गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

भीमेसह घोड नदीचा पूर ओसरला
श्रीगोंदे (जि. नगर) : भीमेसह घोड नदीच्या पाण्याचा विसर्ग कमी होऊन पूर ओसरला. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. दरम्यान, नगर-दौंड महामार्गावरील निमगाव खलू येथील पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहामुळे खचला आहे. सकाळी काही काळ बंद असणारी वाहतूक दुपारनंतर सुरळीत झाली. भीमेसह घोड नदीच्या पुराने रविवारपासून तीन दिवस केलेला कहर आज काही प्रमाणात शांत झाला. गेले सात महिने कोरडेठाक असलेल्या घोड धरणातून ‘उजनी’ला आठ टीएमसीपेक्षा जास्त पाणी गेले. 

२२१ वैद्यकीय पथके नियुक्‍त
सांगली जिल्ह्यातील ५३ हजार २२८ नागरिक, कोल्हापूर ५१ हजार ७८५, सोलापूर ७ हजार ७४९, पुणे १३ हजार ३३६ आणि सातारा जिल्ह्यातील ६ हजार २६२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यांना अन्न आणि पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागात २२१ वैद्यकीय पथके नियुक्‍त केली आहेत.

१६ जणांचा बळी
पूरस्थितीमुळे पुणे विभागात १६ जणांचा बळी गेला. त्यात पुणे जिल्ह्यात चार, सातारा सात, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि सोलापूर येथील एकाचा समावेश आहे.

पुणे विभागात सरासरी १३७ टक्‍के पाऊस 
सर्वाधिक सांगली जिल्ह्यात २१३ टक्‍के, पुणे १६६ टक्‍के, कोल्हापूर ११६ टक्‍के, सातारा १७३ टक्‍के आणि सोलापूर जिल्ह्यात ७८ टक्‍के पाऊस झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मोबाईल क्रमांक
    पुणे ः ८९७५२३२९५५
    सातारा ः ९६५७५२११२२
    सांगली ः ९०९६७०७३३९
    कोल्हापूर ः ९८२३३२४०३२
    सोलापूर ः ९६६५३०४१२४

आपत्ती व्यवस्थापन 
कक्ष क्रमांक (पुणे विभाग)

    पुणे ः ०२०- २६१२३३७१ / २६३४०५३४
    सातारा ः ०२१६२ - २३२१७५/ २३२३४९
    सांगली ः ०२३३ - २६००५००
    सोलापूरः ०२१७ - २७३१०१२
    कोल्हापूर ः ०२३१ - २६५२९५३/२६५२९५०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half million people have been shifted