हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटींची मदत

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

-  सीमेवर लढणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आता एक कोटी रुपयांची मदत केली जाणार

मुंबई : दहशतवाद्यांशी सामना करताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय आज (मंगळवार) राज्य सरकारकडून घेण्यात आला. सीमेवर लढणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आता एक कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. सीमारेषेवर लढताना किंवा युद्धजन्य परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांस राज्य सरकारकडून एक कोटींची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.  

दरम्यान, 27 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होते. अपंगत्व आलेल्या जवानांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार मदत केली जात होती. मात्र, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore aid to the martyrs families will be given from State Government says Devendra Fadnavis