एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नगर - सावेडीतील संत नामदेवनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे आज सकाळी चलनातून बाद झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करून व्यापाऱ्यास ताब्यात घेतले. संजय नामदेव शेलार (वय ४८, मूळ रा. राळेगण म्हसोबा, ता. नगर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती कळविली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावेडीतील संत नामदेवनगरमधील बायजाबाई सोसायटीत कांदा व भाजीपाल्याचा व्यापारी संजय शेलार कुटुंबासह राहतो.

चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा त्याने घरात दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपासून पोलिसांनी शेलार याच्यावर पाळत ठेवली होती.

पोलिस पथकाने आज सकाळी सात वाजता शेलार याच्या घराजवळ सापळा लावला. पैशाने भरलेली पिशवी घेऊन सकाळी साडेनऊच्या सुमारास शेलार बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यास पकडले. पोलिसांनी घराची झडती घेतली. त्याच्या पिशवीत ९९ लाख ९८ हजार ५०० रुपये आढळून आले. त्यात सर्व नोटा चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या आहेत. पोलिसांनी नोटा जप्त करून शेलार याला ताब्यात घेतले. त्याच्या घरात नोटा मोजण्याचे मशिनही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिस निरीक्षक वाखारे म्हणाले, ‘‘सध्या शेलार याचे कुटुंब गावी गेल्याने तो घरी एकटाच होता. नगर बाजार समितीत त्याचा कांदा-भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. ‘या नोटा माझ्या वापरातल्या आहेत. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी जमा केली होती. ती बॅंकेत भरायची राहून गेली’, असे तो सांगत आहे. डायरीला नोंद करून पकडलेल्या नोटांबाबत आयकर विभागाला कळविले आहे.’’ 

तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास देशमाने, कृष्णा वाघमारे, दीपक रोहकले, भास्कर गायकवाड, संजय काळे, नितीन भताने, योगीराज सोनवणे, पांडुरंग गवांदे, हारुन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रॅकेटची शक्‍यता 
हजार-पाचशेच्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत संपली आहे. मात्र, परदेशी नागरिक अजूनही या नोटा जमा करू शकतात. अरणगाव परिसरात परदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. शेलार त्यांच्यामार्फत नोटांची विल्हेवाट लावत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकारात अजून काही लोकांचा सहभाग असून, त्यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली.

Web Title: One crore old note seized