ताम्हिणी घाटात रस्ता फूटभर खचला

मकरंद ढमाले ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पुणे-कोलाड मार्गावर ताम्हिणी घाटात निवे (ता. मुळशी) गावच्या हद्दीत पंचवीस दिवसांपूर्वी काळुबाई मंदिराजवळ मधोमध भेग पडली होती. तिची रुंदी व खोली वाढ होत असून रस्ता आणखी फूटभर खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळी रस्ता जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

 

पुणे-कोलाड मार्गावर रात्रीच्या वेळी जड वाहतूक बंद

माले (पुणे) ः पुणे-कोलाड मार्गावर ताम्हिणी घाटात निवे (ता. मुळशी) गावच्या हद्दीत पंचवीस दिवसांपूर्वी काळुबाई मंदिराजवळ मधोमध भेग पडली होती. तिची रुंदी व खोली वाढ होत असून रस्ता आणखी फूटभर खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळी रस्ता जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

ताम्हिणी-कोलाड मार्ग ऑगस्टमध्ये निवे ते डोंगरवाडीदरम्यान दरीच्या बाजूने ठिकठिकाणी खचला होता. त्यावर दहा-बारा फूट लांब भेगा होत्या. त्यानंतर प्रशासनाने ठिकठिकाणी सूचनाफलक, बॅरेल लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. या खचलेल्या रस्त्याची स्थिती सध्या पडत असलेल्या पावसात आणखी धोकादायक झाली आहे. रस्ता हळूहळू खचत असून त्या भेगा आणखी रुंद झाल्या आहेत. रस्ता आणखी फूटभर खचला आहे. रस्ता खचण्याचे प्रमाण पाहता आगामी काळात वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्‍यता आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
परिसरात जोराचा पाऊस व धुके असते, रस्ता निसरडा झाला आहे. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने अवजड वाहन रस्त्यावरून चुकीच्या बाजूस गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

महिनाभरापूर्वी पहिल्यांदा रस्ता खचण्याचा प्रकार लक्षात आला; परंतु फलक लावण्यापलीकडे त्यावर कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही. अवजड वाहनांची वाहतूक बंद करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ताम्हिणीचे उपसरपंच योगेश बामगुडे यांनी केली.

 

 
पुणे-कोलाड रस्ता ऑगस्टमध्ये एका बाजूने खचला होता. जड वाहने जाऊन तो दुसऱ्या बाजूनेही खचत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी ताम्हिणी घाटातून रात्रीच्या वेळी होणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. आगामी काळात जड वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागण्याची शक्‍यता आहे.
-अनिल लवटे,
फौजदार, पौड पोलिस ठाणे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One feet road damaged in thamhini ghat