मंत्रालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. धुळ्याचे बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच बबन झोटे यांना ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
 

मुंबई : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. धुळ्याचे बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच बबन झोटे यांना ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
 
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बबन झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते. धुळे नगरपालिका असताना 1989 मध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी लेखी मागणी त्यांनी केली होती. अन्यथा मंत्रालयाच्या कोणत्याही प्रवेद्वाराजवळ आत्महत्या करू, याला धुळे महानगरपालिका जबाबदार असेल असा इशारा झोटे यांनी दिला होता. यावर काहीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. 

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने केलेला खुलासा असा, की झोटे यांनी तीन एप्रिल 2018 रोजी शासनाला निवेदन दिले होते. या निवेदनात धुळे महापालिकेत 1989 मध्ये झालेल्या मागासवर्गीय सरळसेवा भरतीची एक महिन्यात सीआयडीमार्फत चौकशी करावी तसेच, उच्च न्यायालयाने कामगार न्यायालयाचा आदेश रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयास धुळे महानगरपालिका जबाबदार असल्याने या प्रकरणी महानगरपालिकेने उच्च न्यायालयास विनंती करून आपणास सेवेत घेण्यात यावे, अशी विनंती केली होती. 

त्याचबरोबर चौकशी न केल्यास मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहन करू असा इशाराही दिला होता. महानगरपालिकेच्या सेवेत घेण्यासंदर्भात झोटे यांची विनंती आहे. यासंदर्भात धुळे महानगरपालिका हे सक्षम प्राधिकरण आहे. त्यामुळे झोटे यांनी धुळे महानगरपालिकेतील सरळसेवा भरतीबाबत दिलेल्या निवेदनासंदर्भात आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना शासनाकडून धुळे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्या होत्या. 

Web Title: one man attempt to suicide in front of ministry