‘राइज मेगा जॉब फेअर’मध्ये बाराशे तरुणांना मिळाला रोजगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

रोजगार मेळावे म्हणजे तरुणांसाठी आश्‍वासक व्यासपीठ आहे. याद्वारे कंपन्याच आमच्यासारख्या होतकरू उमेदवारांच्या जवळ येतात. त्यामुळे नोकरीची संधी मिळते आणि हमखास नोकरीही मिळते, अशा भावना व्यक्त करीत ‘राइज’ या ‘मेगा जॉब फेअर’मध्ये साडेतीन हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. यातील बाराशे तरुणांना रोजगारही मिळाला.

पुणे - रोजगार मेळावे म्हणजे तरुणांसाठी आश्‍वासक व्यासपीठ आहे. याद्वारे कंपन्याच आमच्यासारख्या होतकरू उमेदवारांच्या जवळ येतात. त्यामुळे नोकरीची संधी मिळते आणि हमखास नोकरीही मिळते, अशा भावना व्यक्त करीत ‘राइज’ या ‘मेगा जॉब फेअर’मध्ये साडेतीन हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. यातील बाराशे तरुणांना रोजगारही मिळाला.

‘एपीजी लर्निंग’ने या उपक्रमाचे आयोजन केले होते. लोढा बेलमोंडो (गोल्ड स्पॉन्सर), लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी (सिल्व्हर स्पॉन्सर) यांनी या उपक्रमाला प्रायोजकत्व दिले. ‘सकाळ’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक होता. मेडिकल पार्टनर रुबी हॉल क्‍लिनिक आणि भारती विद्यापीठाची इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड आंत्र्यप्रिन्युयरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) संस्था व्हेन्यू पार्टनर होते. या उपक्रमात ५० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 

‘सिमॅन्टेक’च्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख सुधांशू पंडित, लोढा बेलमेंडोचे सरव्यवस्थापक (विक्री) विनीत भसीन, ‘लोकमान्य’चे विभागीय प्रमुख सुशील जाधव, आयएमईडीचे प्राचार्य डॉ. एस. एस. वेर्णेकर, ‘रुबी’चे डॉ. संजीव तांदळे, ‘एपीजी लर्निंग’चे बिझनेस हेड अंकित माहेश्‍वरी, हेड प्रोजेक्‍ट क्‍युरेटर विद्योत्तमा शर्मा, हेड स्ट्रॅटेजिक अलायन्स वामा शहा आदी उपस्थित होते. 

सकाळी नऊपासूनच जॉब फेअरसाठी उमेदवारांनी गर्दी करण्यास सुरवात केली. उद्‌घाटनानंतर विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पंडित म्हणाले, ‘‘तुमच्या यशापयशाची आणि प्रत्येक कृतीची जबाबदारी तुम्ही घ्या, इतरांना दोष देऊ नका. सध्या प्रत्येक जण मोबाईलसारख्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंबरोबर खेळण्यात व्यग्र आहे. त्यामुळे संभाषणाची कला हरवत चालली आहे. सुरवातीच्या काळात पैशांपेक्षा नोकरीत शिकायला काय मिळते, याचा अधिक विचार करा.’’

भसीन म्हणाले, ‘‘भरती मेळावे म्हणजे तरुणाईसाठी ही संधी आहे. यातून अनेकांचे भविष्य घडते. आम्ही महाविद्यालयात होतो, त्या वेळी अशा संधी उपलब्ध नव्हत्या. त्या तुलनेत आता नोकरीसाठी खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत.’’ 

डॉ. वेर्णेकर म्हणाले, ‘‘स्वत:मधील सामर्थ्य आणि कमतरता ओळखा. स्वत:वर विश्‍वास ठेवून चांगले गुण दाखविण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच यश मिळेल.’’

सरकारी नोकरीमध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी असे रोजगार मेळावे नक्कीच फायदेशीर ठरतात.
- शिल्पा वेताळ, उमेदवार

रोजगार मेळावा ही चांगली संधी आहे. कारण नोकरीसाठी तुम्हाच्या जवळ अनेक कंपन्या येत असतात. प्रत्येक कंपनीमध्ये जाण्यासाठी धावपळ करावी लागत नाही.
- अमित सिंह, उमेदवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one thousand two hundred youth got employment in Rise Mega Job Fair