
Onion Crices : बाजार समित्या बंदचा असाही फटका ; व्यावसायिकांवर उपासमार ; कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न
Onion Crices : शहरी भागात कांद्याचे भाव ४० रुपये किलोच्या पुढे गेल्याने केंद्र सरकारने १९ ऑगस्टला कांदा निर्यातशुल्क लादले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या गेल्या १२ दिवसांपासून बंद असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या स्थितीत फक्त शेतकरी व व्यापारीच नव्हे; तर कांदा निर्यात वाहतूकदार, कांदा खळ्यांवर काम करणारा, गोण्या शिवणारे, भेळभत्ता, गॅरेज, गुड सर्विस, कापड व्यावसायिक व इतर घटक अडचणीत आले आहेत.
विविध मागण्यांबाबत व्यापारी कांदा लिलावात सहभागी झालेले नाहीत. यामुळे लासलगाव बाजार समितीत शुकशुकाट आहे. येथील व्यापाऱ्यांचे कांदा खळ्यात, कांदा प्रतवारी, कांदा पॅकिंग करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लासलगाव बाजार समितीत रोज हजार ते १५०० ट्रॅक्टर व छोट्या-मोठ्या वाहनांतून कांदा विक्रीसाठी येतो. कांदा निर्यातीसाठी वाहतूक होत नसल्याने शेकडोहून अधिक वाहने जागेवर उभी आहेत. वाहन कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रान्स्पोर्ट व्यवसाय संकटात
येथून मोठ्या प्रमाणात कांदा ट्रकने बाहेरगावी जातो. बंदमुळे अनेक ट्रान्सपोर्टवर शुकशुकाट आहे. रेल्वेने कांदा पाठविण्यासाठी ट्रकने कांदा भरून निफाड, खेरवाडी, लासलगाव रेल्वेस्थानकावर पाठविला जातो. लिलावच होत नसल्याने चालक व क्लीनर यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे.
वॅगन उपलब्ध; परंतु कांदाच नाही
निर्यातशुल्क वाढल्याने अडचणी वाढल्या आहेत. निर्यात थांबल्याने वाहतूकदार, निर्यातदार, निर्यात संबंधित कस्टम हाऊस एजंट, शिपिंगलाईन यासह शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे केंद्राने तातडीने ही कोंडी सोडवावी. निर्यात शुल्क रद्द करून पूर्ववत करावा.
-सुनील मुळीक, सचिव, रिफर कंटेनर ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन
बाजार समिती बंद असल्याने कांदा गोणी शिवणाऱ्या आम्हा महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. सणासुदीच्या काळात आमची मोठी अडचण झाली आहे. घराचा डोलारा कसा सांभाळावा, हा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे.
-सलमा शेख, गोणी शिवणारी महिला, लासलगाव
सलग बाराव्या दिवशी बाजार समिती बंद असल्याने माझ्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. माझा संपूर्ण कुटुंब यावर चालते. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. घर कसे चालायचे, हा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर आहे.
-यमुना शेरेकर, कांदा खळ्यावरील महिला कामगार, लासलगाव
ट्रॅक्टर, पिक-अप, छोटा हत्तीला भाडे नाही
लासलगाव बाजार समितीत ट्रॅक्टर, पिक-अप आणि छोटा हत्तीमधून कांदा आणला जातो. शेतकरी भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर व पिकअप घेऊन बाजार समितीत कांदा आणतात. बंदचा फटका ट्रॅक्टर व पिक-अपमालकांना बसला आहे.