आंदोलनाची धग कायम

आंदोलनाची धग कायम

नाशिक - कांद्याची निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंधावरून पेटलेल्या आंदोलनाची धग कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात आज कायम राहिली.

औरंगाबाद-अहवा मार्गावर द्याने येथे शेतकऱ्यांनी अर्धा तास आंदोलन छेडत निवडणुकीवर सामूहिक बहिष्काराचा इशारा दिला; तसेच निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंध न हटवल्यास सोमवारपासून (ता. ७) जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय आज पिंपळगावमध्ये बाजार समित्या पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.

बाजारपेठेतील कांद्याच्या भावातील घसरण सुरूच आहे. आज क्विंटलला सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली. जळगावमध्ये २५, येवल्यात ५०, नाशिकमध्ये २५०, कळवणमध्ये २००, देवळ्यात ४००; तर पिंपळगावमध्ये ५० रुपयांनी भाव घसरले. दिल्लीत ३ हजार २०० पर्यंत; तर चेन्नईत ४ हजार ३०० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. सायखेडा (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांनी आजही कांदा विक्रीसाठी न आणल्याने लिलाव झाले नाहीत.

१२ लाख टन शिलकीची शक्‍यता
उन्हाळ कांदा देशामध्ये १२ लाख टनापर्यंत शिल्लक राहिला असण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण यंदा खूपच कमी आहे. देशाला दहा दिवस पुरेल इतका कांदा नाशिक, नगर, पुणे, मध्य प्रदेशात शिल्लक असण्याचा अंदाज आहे. जुलै-ऑगस्टमध्ये देशाचे सर्वसाधारण खरीप क्षेत्र १ लाख ८० हजार हेक्‍टर असून, त्यात ३० टक्‍क्‍यांची घट झालीय. महाराष्ट्राचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्‍टर असून, ऑगस्टअखेर ४२ हजार हेक्‍टरवर लागवडीची नोंद आहे. त्यावरून तीस टक्‍क्‍यांची घट स्पष्ट होते. महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक नोव्हेंबरपासून आवक सुरू होईल. आंध्र प्रदेश, कर्नाटकात जुलैच्या लागवडीचा नवीन कांदा ऑक्‍टोबरमध्ये बाजारात येतो. त्याचवेळी जुलै-ऑगस्टमधील लागवडीचा कांदा गेल्या महिन्यात पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे मोठे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com