महानगरी मुंबईतही केवळ 17 टक्के महिला कर्मचारी 

महानगरी मुंबईतही केवळ 17 टक्के महिला कर्मचारी 

महिला दिन 2019  मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नासा फक्‍त अंतराळ वीरांगनांचा "स्पेसवॉक' घेत आहे, जगातील महिला राष्ट्रप्रमुखांची संख्याही लक्षणीय आहे. हे चित्र "उंच माझा झोका', असे दिसत असले, तरी सर्वसाधारण महिलांच्या स्थितीत मात्र फारसा फरक झालेला नाही. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या अत्याधुनिक मुंबई महानगरातही जेमतेम 17 टक्‍के महिला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतात. उच्चपदस्थ, कॉर्पोरेट, नोकरदार आणि कष्टकरी अशा सर्व वर्गांतील महिलांची बेरीज केली, तरी हे प्रमाण 20 टक्‍क्‍यांवर जात नाही. मुंबई महापालिकेने विकास आराखडा तयार करताना केलेल्या अभ्यासातून ही धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. 

मुंबईतील 55 ते 58 टक्‍के पुरुष अर्थार्जनासाठी कोणत्या तरी स्वरूपाचे काम करत असले; तरी महिलांचे प्रमाण मात्र त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. हे प्रमाण काही दशकांत वाढले असले; तरी ही वाढ अवघी चार ते पाच टक्के आहे. बालसंगोपनाची जबाबदारी आणि प्रतिकूल वातावरणामुळे महिलांचा अर्थार्जनात सहभाग कमी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आता तपासून पाहिला जाणार आहे. 

महाराष्ट्रात कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबांमधील 44 टक्‍के महिला नोकरीसाठी बाहेर पडतात, अशी माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील महिलांचे प्रमाण मात्र आश्‍चर्यकारकरित्या कमी आहे. 

कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे महिला कामासाठी घराबाहेर जात नाहीत, हे लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर पाळणाघरे सुरू करण्यात आली. मुंबई महापालिकेचे आयुक्‍त अजोय महेता यांनी महिलांचे रोजगारातील प्रमाण वाढले तर विकासदरात वाढ होईल हे लक्षात घेत ठिकठिकाणी सोईसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील 3500 अभियंत्यांमध्ये केवळ 12 टक्‍के महिला आहेत. 11 हजार टॅक्‍सी आणि रिक्षाचालकांपैकी केवळ 90 महिला आहेत. बसवाहकांची एकूण संख्या 11 हजार असली, तरी त्यापैकी फक्त 17 महिला आहेत. हे प्रमाण अत्यंत चिंताजनक असल्याचे मत एसएनडीटी महिला महाविद्यालयातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक पुतुल यांनी व्यक्त केले. महिलांसाठी समाजात योग्य परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. हवाई वाहतुकीत मात्र महिलांनी वैमानिक म्हणून भरारी घेतली आहे. देशातील 1267 वैमानिकांत महिलांचे प्रमाण 12 टक्‍के आहे. 

मुंबईतील महिला कर्मचारी 

जनगणना महिला 
1961 8.81 टक्के 
1971 7.72 टक्के 
1981 8.97 टक्के 
1991 11.02 टक्के 
2001 13.06 टक्के 
2011 16.38 टक्के 

सरकार म्हणते, प्रयत्न सुरू 
महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढे यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उच्चशिक्षण महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या तरुणींचे प्रमाण वाढले आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. विद्यार्थिनींचे प्रमाण आयआयटीमध्ये 16 टक्‍के आणि एनआयटीमध्ये 19 टक्‍क्‍यांवर गेले आहे. "बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानांतर्गत देशभरात तीन हजार वसतिगृहे उभारण्यात आली असून, बारावीपर्यंतच्या चार लाख मुलींची सोय झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com