महाराष्ट्रातील धरणे 'डेंजर झोन'मध्ये! फक्त सात टक्के पाणी शिल्लक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय.

नाशिक - मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार २६७ मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील साठा तिपटीने कमी असून, आता ६.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये ४.६४ टक्के पाणी उरले असल्याने चिंतेत भर पडली आहे.

विभागनिहाय धरणांमध्ये शिल्लक असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षीच्या ११ जूनच्या जलसाठ्याची टक्केवारी) ः अमरावती - ७.७६ (११.४९), औरंगाबाद - ०.५४ (१५.६६), कोकण २५.९७ (३४.१६), नागपूर ५.८४  (११.४६), नाशिक - ५.१८ (१५.२८), पुणे - ६.४९ (१९.८२). गेल्या वर्षी राज्यातील सर्व धरणांमध्ये १७.८४ टक्के पाणी शिल्लक होते. ही सारी परिस्थिती पाहता, कोकण वगळता इतर भागांतील कोरड्याठाक धरणांची संख्या वाढत चालली आहे. 

राज्यातील ३४ प्रकल्प कोरडे
राज्यातील एकुण १४१ मोठ्या प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्प कोरडे झाले आहेत. त्यात नाशिक प्रदेशातील आठ प्रकल्पांचा आणि इतर तीन प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यातील २५८ मध्यम आणि २ हजार ८६८ लघू प्रकल्पांपैकी कोकण विभागाचा अपवाद वगळता इतर प्रकल्पांमधील साठा असून नसल्यासारखा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only seven percent of water left in the dam in Maharashtra