"उद्धवजी पुन्हा विचार करा" भाजप नेत्याकडून उद्धव ठाकरेंना खुली ऑफर? चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Open offer from BJP leader to Uddhav Thackeray

"उद्धवजी पुन्हा विचार करा" भाजप नेत्याकडून उद्धव ठाकरेंना खुली ऑफर? चर्चांना उधाण

अधिवेशन आता संपत आलेलं असताना विधानभवनात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचे मित्र पण आताचे कट्टर विरोधक एकत्रच विधानभवनात येताना दिसले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी आज एकत्र विधानभवन परिसरात प्रवेश केला. त्यामुळे चर्चेचा विषय ठरत असतांनाच भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या ऑफरच देऊन टाकली.

विधानपरिषदेत बोलत असताना ते म्हणाले, उद्धवजी तुम्ही अजूनही शांततेने विचार करा, आपल्याला झाड वाढवायचे आहे. त्याला खत द्यावे लागेल, तुम्ही काय घाबरताय म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ऑफर दिली.

दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रच येताना दिसले. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सभागृहाचं कामकाज सुरू होत असताना या दोघांनी एकत्रच हसत हसत विधानभवनात प्रवेश केला.

शिवसेनेतल्या बंडापासून आज पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले. दरम्यान यावर आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आधी खुले पणा होता, आता बंद दाराआड चर्चा देखील फलदायी होते असं म्हणतात, कधी तरी आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू, आज आम्ही दोघे एकत्र प्रवेश द्वारातून येताना एकमेकांशी राम राम म्हणतात तसं ते झालं" अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.