शेतकरी मारहाणीप्रकरणी विरोधक आक्रमक

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 25 मार्च 2017

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला मारहाणप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी या घटनेबद्दल सरकारचा निषेध केला.

मुंबई - मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला मारहाणप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी या घटनेबद्दल सरकारचा निषेध केला.

विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे सर्वच आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. विधानभवनाच्या परिसरात सरकराविरोधी घोषणा देत विरोधकांनी निषेध फेरी काढली. यावेळी "भाजप सरकारचा धिक्कार असो', "शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे',"कोण म्हणतयं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाय', "फडणवीस सरकारचा निषेध', "मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या सरकारच धिक्कार असो', "शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो', "शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे' अशी घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी भुसारे यांचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; मात्र आपल्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी शासनाकडे केली होती. मात्र, दोन वर्षे पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने भुसारे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरवले. त्यासाठी गुरुवारी ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच सुरक्षारक्षांनी भुसारे यांना मुख्यमंत्री कार्यालयापासून मारहाण करत जबरदस्तीने मंत्रालयाच्या बाहेर नेल्याचे भुसारे यांनी "सकाळ'ला सांगितले. पोलीसांनी भुसारे यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विरोधक अक्रमक होत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत.

Web Title: opponents aggressive on Farmer beaten issue

व्हिडीओ गॅलरी