पोलिस भरती धोरणाला विरोध

Police-Recruitment
Police-Recruitment

भवानीनगर - पोलिस भरतीसाठी आधी लेखी परीक्षा व एकास पाच हे प्रमाण सरकारने निर्धारित केल्यानंतर राज्यभरातून उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. हे धोरण बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे.

पोलिस भरतीचे नवे निकष सरकारने जाहीर केले. मात्र, हे निकष जाहीर करताना वर्षभर ज्यांनी मैदानी चाचणीवर भर दिला त्यांनी आता काय करायचे, हा प्रश्न उमेदवारांपुढे आहे. या नव्या निर्णयाचा फायदा पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्यांपेक्षा एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनाच अधिक होईल, अशी भीती या उमेदवारांना वाटू लागली आहे.

फौजदारकीच्या परीक्षेत १०० गुणांची मैदानी चाचणी कायम ठेवणाऱ्यांनी जो शिपाई जनतेत मिसळून वागणारा घटक आहे, त्याला खुर्चीत बसण्यापेक्षा फिरून काम करायचे आहे. थेट गुन्हेगारांशी दोन हात करायचे आहेत. त्याचा फिटनेस कशासाठी काढून घेतला? या प्रश्नाने उमेदवार अस्वस्थ आहेत. मैदानी चाचणीच्या तयारीसाठी वर्षभर घाम गाळणाऱ्यांना अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. 

केंद्रांची व्यवस्था कशी करणार?
एका वेळी सात लाख उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. अगदी मुंबईचा विचार केला, तर मुंबईत १.७५ लाख उमेदवार लेखी परीक्षा देतात.

मग एवढ्या उमेदवारांसाठी पुरेशी मैदाने, परीक्षा केंद्रांची व्यवस्था सरकारकडे आहेत का? एकट्या पुण्यात लोहमार्ग, ग्रामीण व शहराची संख्या एकत्रित धरली, तर ९० हजारांहून अधिक उमेदवार असतात. त्यांची व्यवस्था कशी करणार? हा प्रश्न अधोरेखित होत आहे. हा एक प्रकारे अन्याय होणार आहे. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, पूर्वीप्रमाणेच मैदानी चाचणी अगोदर होऊन लेखी परीक्षा नंतर घेतली जावी व उमेदवारांचे प्रमाणही पूर्ववत ठेवावे, अशी अपेक्षा बारामतीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश रूपनवर यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचा आक्षेप नेमका कशासाठी?
पोलिस भरतीकरिता सन २००६ पासून मॅकेन्झी अहवालानुसार एका जागेसाठी १५ उमेदवार, असे प्रमाण असतानाही मैदानी चाचणीतील मेरिट अगदी ९० ते ९७ पर्यंत असते. मागील वर्षी ठाण्यामध्ये हेच मेरिट ९७, मुंबईत ९०, पुण्यात ग्रामीणकरिता ९१ पर्यंत होते. त्याचा विचार करता एकास पाच या धोरणाने उमेदवारांना लेखीमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले, तरच त्यास मैदानी चाचणीत प्रवेश मिळेल, असा धोका निर्माण झाला आहे. सरकारने हे धोरण बदलले पाहिजे व पूर्वीप्रमाणेच १०० गुणांची मैदानी चाचणी घेतली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.

आम्ही जी मैदानी चाचणीची तयारी केली. त्यावर अचानक निर्णय घेतला. यामुळे आमच्या तयारीवर खूप प्रतिकूल परिणाम होणार आहे. यात सरकारने बदल करण्याची अपेक्षा आहे. 
- प्रीती पांढरे, विरार, मुंबई

परीक्षेचे काही नाही, मात्र उमेदवारांचे एकास १५ हे प्रमाण कायम ठेवून मैदानी चाचणीचे गुण १०० च असायला हवेत.
- सुनील बर्डे, लातूर  

लेखी परीक्षा आधी घेतली, तर साहजिक आहे की एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचाच फायदा होणार आहे. हा निर्णय कशासाठी घेतला, हेच समजत नाही.
- बाळासाहेब राठोड, बीड 

एका वर्षापासून तयारी करीत आहे. असा विचित्र निर्णय घेतला, तर आमच्या तयारीचा उपयोग काय?
- कविता गावडे, भूम, उस्मानाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com