विरोधी पक्षांनी सुचवावा "शेतकरी आत्महत्यां'वर तोडगा - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर अवश्‍य विचार करू,'' असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी आज केले.

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दानवे पत्रकारांशी बोलत होते. साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, नितीन कापसे उपस्थित होते.

दानवे म्हणाले, 'कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, तर सर्व विरोधकांनी राजकीय जोडे काढून एकत्र यावे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा ठोस प्रस्ताव द्यावा. शेतीला पाणी आणि वीज उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही केलेले प्रयत्न यशस्वी झाले. आधी शेतीतील गुंतवणूक वाढवू, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही अशा उपाययोजना करू, मग कर्जमाफीचे पाहू.''
उत्पादित तुरीची 25 टक्‍क्‍यांहून अधिक खरेदी सरकारने केली, असे सांगून दानवे म्हणाले, 'मागणी व पुरवठा यावर शेतमालाचे भाव अवलंबून असतात, तरीही यंदा कपाशीला चांगले भाव मिळाले. शेतमाल विक्रीवरील बंधने आम्ही उठविली. पूर्वीच्या सरकारने 15 वर्षांत केले नाही एवढे काम आम्ही केले.''

'तांत्रिक बिघाडामुळे सध्या वीजटंचाई आहे. प्रत्यक्षात जास्त निर्मितीमुळे बाहेरच्या राज्यांना आपण वीज विकतो आहोत. मूलभूत सोयी व्यवस्थित नसल्याने ही वीज शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्याची उभारणी सुरू आहे,'' असेही दानवे म्हणाले.

"...म्हणून शिवसेनेची चिडचिड'
शिवसेनेला चिमटा काढताना रावसाहेब दानवे म्हणाले, ""राज्याची सत्ता शिवसेनेला मिळेल असे वाटले होते. प्रत्यक्षात आम्ही सत्तेत आलो, त्यामुळे त्यांचे नेते चिडचिड करतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचे मंत्री गप्प आणि नेते मात्र बाहेर टीका करतात. ते मित्रच आहेत. त्यांच्या टीकेची सवय झाली आहे.''

Web Title: Opposition parties suggest 'farmer suicides' will be resolved