सरकारच्या निषेधार्थ विरोधकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवन आवारात विरोधकांनी अशा प्रकारे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला. 

मुंबई - घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवन आवारात विरोधकांनी अशा प्रकारे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला. 

या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनात कर्जमाफी न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवत स्टेट बॅंकेपासून राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. ही यात्रा विधानभवनच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आली. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांच्यासह विरोधी पक्षातील आमदार सहभागी झाले होते. विरोधकांनी या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि फलक झळकावत सरकारचा निषेध नोंदवला. 

अजित पवार म्हणाले, की अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकार कर्जमाफीची घोषणा करेल असे आम्हाला वाटले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही वारंवार मागणी करूनही सरकारने कर्जमाफी केली नाही म्हणून आम्हाला या सरकारची प्रेतयात्रा काढावी लागली. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले योगी आदित्यनाथ कर्जमाफीची घोषणा करू शकतात, मग अडीच वर्षे जुने देवेंद्र फडणवीस हा निर्णय का घेऊ शकत नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष या पुढे आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला. धनदांडगे कोट्यवधी रुपये बुडवत आहेत आणि रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल कर्जमाफीविरोधी वक्तव्ये करीत आहेत. पटेल यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. पटेल यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत, अशी भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली. 

Web Title: Opposition symbolically dead