
Chitra Wagh : गंगा भगीरथी शब्दाला भाजपमधून विरोध! चित्रा वाघ यांनी सांगितला नवीन शब्द!
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवला आहे. विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हटले पाहिजे, असे लोढा म्हणाले. यासंदर्भात लोढा यांनी प्रधान सचिवांना पत्र देखील लिहिले आहे.
लोढा यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काही सामाजिक व महिला कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील लोढा यांच्यावर टीका केली.
दरम्यान भाजपमधून देखील मंगल प्रभात लोढा यांच्या कल्पनेला विरोधा झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नवीन शब्द सुचवला आहे. तसेच त्यांनी गंगा भागीरथी या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.
"गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती, असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे", असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
विधवा महिलांना समाजात जगण्याचा, नैतिक अधिकार कसा प्राप्त करता येईल, यावर लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची करावी. बाकी आम्ही महिला काय नाव लावायची आणि काय लावू नये, हे ठरवू. लोढांनी फार लोड घेऊ नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाले, महिलांबाबत प्रचंड असंवेदनशीलतेने विधाने येत आहेत. ती विधान विशेषता भाजप आणि शिंदे गटाकडून येत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्याने घ्यावे कारण त्यांच्या घरात देखील महिला आहेत.
काय म्हटलं आहे या प्रस्तावात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं.भा.) हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.