अखेरच्या दिवसांत विरोधकांचीच कसोटी

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 1 जुलै 2019

विधिमंडळाच्या या पाच वर्षांतील अखेरच्या अधिवेशनाची सांगता होत असताना विरोधकांची कसोटी लागणार आहे.

मुंबई - विधिमंडळाच्या या पाच वर्षांतील अखेरच्या अधिवेशनाची सांगता होत असताना विरोधकांची कसोटी लागणार आहे. अखेरच्या दोन दिवसांत सत्ताधारी मराठा आरक्षणाच्या आनंदोत्सवात बाजी मारण्याचे संकेत असताना महसूल मंत्री व नगरविकास विभागाच्या कथित घोटाळ्याबाबत विरोधकांचा हल्ला किती प्रभावी राहील याबाबत साशंकताच आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या प्रारंभीच मंत्रिमंडळ विस्तार करत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने अधिवेशनाचे रूपच पालटले होते. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना ऐनवेळी सत्तेच्या गोटात ओढून विरोधकांच्या आत्मविश्‍वासावर प्रहार केला. पहिल्या दोन आठवड्यांत विधिमंडळात विरोधकांचे ना वादळ घोंघावले ना सरकारच्या कोंडीचे प्रयत्न झाल्याचे दिसले. एक औपचारिकता म्हणून सर्व कामकाज सुरू असल्याचे चित्र होते. मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी सत्तेतले ‘हेविवेट’ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भूखंड व्यवहाराचे आरोप करत सनसनाटी निर्णाण केली. मात्र मराठा आरक्षणाच्या निर्णयात त्यातली हवाच गेल्याचे चित्र निर्माण झाले. आता पुढच्या अखेरच्या दोन दिवसांत विरोधक कोणत्या गौप्यस्फोटाचे हत्यार वापरतील याची उत्सुकता आहे. मात्र मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णयाला न्यायालयाचे शिक्कामोर्तब झाल्याने दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी आणण्याची शक्‍यता आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली अथवा नाही झाली, तरी सत्ताधाऱ्यांची बाजू वरचढच राहणार हे निर्विवाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष मानला जात असताना मराठा आरक्षणासाठी या पक्षाचे प्रयत्न कसे तोकडे होते, यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेना आमदार सभागृहात मार्मिक शैलीत समाचार घेऊन विरोधकांची कोंडी करतील असे मानले जाते. 

एकंदर, अखेरच्या दोन दिवसांत विरोधकांची संपूर्ण रणनीती मराठा आरक्षणाच्या आनंदोत्सवात झाकून टाकण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाची सकारात्मक सांगता करण्यात यशस्वी होतील असेच संकेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition will face while concluding the Convention