अवयवदानात पुणे राज्यात अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अवयवदान 
पुणे - 59 
मुंबई - 58 
औरंगाबाद - 9 
नागपूर - 6 
एकूण - 132 

पुणे - अवयवदानात पुणे हे गेल्या वर्षी राज्यात अव्वल ठरल्याची मोहोर राज्याच्या आरोग्य खात्याने उमटविली आहे. राज्यात वर्षभरात झालेल्या 132 पैकी पुणे "झेडटीसीसी'च्या वतीने 59 जणांनी यात अवयव दान केले आहे. 

अवयवदानाबाबत जनजागृती वेगाने होत असल्याने या क्षेत्रात महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातही पुणे "झेडटीसीसी' (झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी) अवयव दानाची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवत असल्याने सर्वाधिक अवयवदान पुण्यातून झाल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविली आहे. 

पुणे "झेडटीसीसी'चे कार्यक्षेत्र 
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांतील काही रुग्णालयांना अवयवदानाची परवानगी राज्य सरकारने दिली आहे, त्यामुळे या रुग्णालयांमधून होणारे अवयवदान योग्य आणि गरजू रुग्णांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी "झेडटीसीसी'वर सोपविण्यात आली आहे. राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार "झेडटीसीसी' निर्माण केल्या आहेत. 

"पुणे झेडटीसीसी' अव्वल 
राज्यातील अवयवदानात आतापर्यंत मुंबई एकटीच आघाडीवर होती. एक कोटीच्या घरातील लोकसंख्या, अवयवदानाची परवानगी असलेल्या रुग्णालयांची मोठी संख्या, कुशल डॉक्‍टर आणि पायभूत सुविधा त्यामुळे मुंबईमध्ये दर वर्षी मोठ्या संख्येने अवयवदान होत असल्याची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरी आहे. गेल्या वर्षी प्रथमच मुंबईपेक्षा पुणे "झेडटीसीसी' राज्यात सर्वाधिक अवयवदान केल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. 

सरकारी रुग्णालयातील पहिले अवयवदान 
राज्यातील सरकारी रुग्णालयातील पहिले अवयवदान पुण्यातील ससून रुग्णालयात झाले. या रुग्णाने दान केलेल्या यकृत आणि मूत्रपिंडामुळे दोन रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. 

अवयवदानाची शास्त्रीय माहिती लोकांना असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. "प्रादेशिक अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थे'च्या (रोटो) माध्यमातून हे उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहेत. त्यातून या वर्षी पुण्यासह इतर विभागांतून अवयवदानाचे प्रमाण वाढेल. 
- डॉ. गौरी राठोड, सहायक संचालिका, आरोग्य खाते 

पुणे विभागातून 59 रुग्णांनी मरणोत्तर अवयवदान केले. त्यापैकी कोल्हापूर येथून एक आणि नाशिकमधून पाच रुग्णांनी अवयवदान केले असून, उर्वरित 53 अवयवदान पुण्यात झाले आहेत. 
- आरती गोखले, समन्वयक, पुणे "झेडटीसीसी' 

Web Title: Organ donation in the top Pune