कोल्हापूरातून आयोजकांना धमकीचा फोन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नाशिक: नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेच्या आयोजकांना कोल्हापूरातून फोनवरून धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात पोलिसांकडून कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्याचप्रमाणे, प.सा. नाट्यगृहाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. याचदरम्यान, पर्यटक व्हिसा घेऊन आलेले दोन परदेशी युवक कन्हैया कुमारच्या सभेला येणार असल्याच्या माहितीमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी, ते आल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना मज्जाव करून बाहेर काढून दिले.

नरेंद्र दाभोळकर यांची हत्त्या झाल्यापासून विवेक व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यात कन्हैयाकुमार यांचे व्याख्यान होते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व्याख्यानमालेचे आयोजक सचिन मालेगावकर यांच्या मोबाईलवर दोन वेळा फोन आले आणि संबंधिताने कोल्हापूरातून बोलत असल्याचे सांगून फोनवरून धमकी दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यासंदर्भात मात्र अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच, व्याख्यानापूर्वी पोलिसांना दोन परदेशी युवक सभेला येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी प्रवेशद्वारावर कसून तपासणी सुरू केली. वरुण चव्हाण नामक व्यक्तीसमवेत दोन फ्रेंच युवक आले असता, त्यांना चौकशीसाठी रोखण्यात आले. त्यावेळी चव्हाण नामक व्यक्तीने पोलिसांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तर दोन्ही फ्रेंच युवकांकडील पासपोर्ट व व्हिसा तपासणी केला असता, ते पर्यटक म्हणून आले होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांना सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडले. मात्र, त्यांची नावे घेऊन ती माहिती संबंधित विभागाला दिली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. 

पसाला पोलीस छावणीचे स्वरुप 
प.सा.नाट्यगृहात कधी नव्हे ते पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे, अशोक नखाते, बापू बांगर यांच्यासह सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबई नाक्‍याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज कारंजे, आडगावचे सुरज बिजली, मध्यवर्ती गुन्हेशाखेचे कुमार चौधरी यांच्यासह राखीव पोलिस दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सभेसाठी येणाऱ्यांना कोणत्याही वस्तूसह जॅकेट, रेनकोट घेऊन जाण्यासही मज्जाव करण्यात आला होता.

Web Title: Organizer threatens phone calls from Kolhapur