युतीच्या धुळवडीत अन्य पक्षांची चांदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड आणि दोन्ही कॉंग्रेसची आघाडी फिसकटल्यामुळे लहान पक्षांत आनंदाचे वातावरण आहे. या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, रिपाइं, एमआयएम आदी पक्षांचे नेते सरसावले आहेत. विशेषतः मतांमध्ये होणाऱ्या फाटाफुटीत मुंबईत अधिक जागा जिंकण्यावर या नेत्यांनी भर दिला आहे.

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड आणि दोन्ही कॉंग्रेसची आघाडी फिसकटल्यामुळे लहान पक्षांत आनंदाचे वातावरण आहे. या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, रिपाइं, एमआयएम आदी पक्षांचे नेते सरसावले आहेत. विशेषतः मतांमध्ये होणाऱ्या फाटाफुटीत मुंबईत अधिक जागा जिंकण्यावर या नेत्यांनी भर दिला आहे.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर रिपाइंला अधिक जागा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत भाजपकडून योग्य सहकार्य मिळाल्यास दोन आकडी जागा जिंकण्याची संधी रिपाइंला प्राप्त झाल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले. पंचरंगी लढतीत बहुजन समाज पक्षाला फायदा होत असल्याकडे बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी लक्ष वेधले. मुंबईसह अन्य महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच जागा लढविण्याचा संकल्प गरूड यांनी सोडला आहे. एमआयएमचे नेते आणि आमदार वारीस पठाण यांनी युती आणि आघाडीचा आमच्यावर काहीही परिणाम होत नसल्याकडे लक्ष वेधले.

धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून एमआयएम एक पर्याय आहे. याचा प्रत्यय औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आला. तेथे 26 जागा जिंकल्या. हीच घोडदौड या निवडणुकीत सुरूच राहील. मुंबईसह पुणे, सोलापूर महापालिकेत उमेदवार उभे करण्यात येतील आणि त्यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते ओवेसी बंधू यांच्या 10 ते 15 सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे पठाण यांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी कॉंग्रेसशी आघाडी झाली असती, तर चांगले वातावरण झाले असते, अशी प्रतिक्रिया दिली. युती तुटल्याने युतीच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा समाजवादी पक्षाला होईल. मुंबई 115 च्या आसपास जागा लढविणार असून नागपूर, अकोला, अमरावती व सोलापूर येथेही समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास आझमी यांनी व्यक्‍त केला.

बहुजन समाज पक्षाची निश्‍चित व्होट बॅंक असल्याने पंचरंगी लढतीत बसपला फायदा होईल. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र लढत असल्याने त्यांच्या मतदारांत संभ्रम तयार होतो आणि ती मते बसपला पडतात. नागपूर आणि अमरावती महापालिकेत बसपचा महापौर असेल.
- विलास गरूड, प्रदेशाध्यक्ष, बहुजन समाज पक्ष

धर्मनिरपेक्षेसाठी एमआयएम चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. आम्हीच सेक्‍युलर आहोत, असे सांगणाऱ्या पक्षांवरील मतदारांचा विश्‍वास उडला आहे. त्यामुळे राज्यभरात एमआयएमला प्रतिसाद मिळत आहे.
- वारीस पठाण, आमदार, एमआयएम

दलितबहुल वस्त्यांमध्ये रिपाइंची ताकद आहे. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांच्या मतांची भर पडेल आणि रिपाइंचे अधिक उमेदवार निवडून येतील.
- अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं

समाजवादी पक्षासोबत कॉंग्रेसची युती झाली असती, तर चांगले वातावरण तयार झाले असते. आम्ही चर्चेला तयार असताना कॉंग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. भाजपचा फायदा होण्यासाठी एमआयएम निवडणुका लढवत आहे.
- अबू आझमी, प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पक्ष

Web Title: other parties in advantage with spat of sen bjp