गुजरातमध्ये भाजपचा पराभव अटळ - खासदार राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पंढरपूर - गुजरातमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे काहीही नाही. मी स्वतः गुजरातमधील परिस्थिती अनुभवली आहे. गेल्या 22 वर्षांपासून तेथे भाजपची सत्ता आहे. तेथील लोकांना आता बदल हवा आहे. त्यामुळे या वेळी पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये सत्ताबदल अटळ असल्याचे सांगत, भाजपच्या विरोधात प्रचारासाठी गुजरातमध्ये जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी जाहीर केले.

शेतकरी ऊस परिषदेसाठी शेट्टी आज पंढरपुरात आले होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर टीका करत गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला तर आश्‍चर्य वाटायला नको, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, 'पुण्यात झालेल्या ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत कारखानदारांनी वेळेवर माहिती न दिल्याने ऊसदर निश्‍चिती झाली नाही. गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये पहिल्या हप्त्याची मागणी केली जाणार आहे.''

'सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. त्यामध्ये अनेक चुका असून, बोगस शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेविषयी शंका आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मित्रपक्षाच्या एका आमदाराने जे आरोप केले आहेत, त्याविषयी त्यांच्याकडे पुरावे असतील म्हणूनच त्यांनी आरोप केला असावा. त्यामुळे मंत्री पाटील यांची चौकशी करावी,'' असे शेट्टी यांनी सांगितले.

गुजरातच्या निवडणुकीत भाजपविरोधात प्रचारासाठी जाणार आहे. तेथील चांगल्या प्रतिमेच्या व स्वच्छ उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जात नाही, तोपर्यंत आमची सरकारविरोधात लढाई सुरू राहणार आहे.
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: pandharpur maharashtra news BJPs defeat in Gujarat is inevitable