शेतकरी संपावर गेले तरी फरक पडत नाही - माधव भांडारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पंढरपूर - 'कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही,'' अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी उधळली.

पंढरपूर - 'कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही,'' अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी उधळली.

खासगी कामाच्या निमित्ताने भांडारी आज पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांविषयी ही भाषा वापरली. तसेच शेतकऱ्यांच्या संपामुळे अन्नधान्य कमी पडले तर आयात करू किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करू, असे वक्तव्य केले.

भांडारी म्हणाले, 'विरोधी पक्षांनी यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. त्यांच्या संघर्ष यात्रेला किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही सरकारच्या विरोधात आसूड यात्रा काढली. आता खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्‍लेश यात्रा सुरू आहे. अशा यात्रांमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. अशा यात्रा काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

खासदार शेट्टींचे काय दुखणे आहे, हे अजून तरी आम्हाला कळाले नाही.''
भाजपने आश्‍वासन दिल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत वाटा दिला. सदाभाऊ खोत यांना आमदारकी व मंत्रिपद हे "स्वाभिमानी'च्या नेत्यांच्या सूचनेप्रमाणे दिले. कोणाला आमदार किंवा मंत्री करायचे, हा निर्णय संघटनेच्या नेत्यांनी यापूर्वीच घ्यायला हवा होता. त्यामुळे आता भाजपच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही, असा सल्ला त्यांनी दिला. गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली. तूर, हरभरा, ऊस यासारख्या नगदी पिकांना हमीभाव मिळवून दिला. दुधाला भाव वाढवून दिला. शेती उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते, त्या वेळी भाव पडतात हे त्रिकाल सत्य आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून सरकारने 40 टक्के तुरीची हमीभावाने खरेदी केली. यापूर्वी कोणत्याही सरकारने ती केली नाही. तूर विक्रीमध्ये काही व्यापारी आणि दलालांनी गैरकारभार केला आहे. अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भांडारी यांनी दिली.

अध्यक्षपद नकोच
दरम्यान, विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी आपले नाव चर्चेत आहे, याबाबत विचारले असता त्यांनी, मंदिर समितीसाठी इच्छुक नसल्याचे सांगत, संधी मिळाली तरीही आपण अध्यक्षपद घेणार नाही.

"सदाभाऊ लवकरच भाजपमध्ये'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा वाढला आहे. त्यामुळे "स्वाभिमानी'चे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्‍वास व्यक्त करत खोत यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. माजी मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते हे भाजपच्या संपर्कात आहेत का, या प्रश्‍नावर भांडारी यांनी "राष्ट्रवादी'तील इतरही अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

Web Title: pandharpur maharashtra news It does not matter if the farmer goes on strike