हरिनामाच्या जयघोषाने पंढरी भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पंढरपूर - चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यात आज सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.

पंढरपूर - चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यात आज सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.

चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या दिंड्यांमधील टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. दर्शनासाठी सुमारे अकरा तास वेळ लागत होता. चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरिमहाराज यांच्या हस्ते, तर श्री रुक्‍मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्नीक झाली.

चैत्री एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी गर्दी केली होती. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास पुंडलिक मंदिरापर्यंत आले होते. तत्पूर्वी अनेक भाविकांना नदीपात्रातील घाण पाण्याने स्नान करावे लागले. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

विठ्ठलाच्या दर्शनाची रांग एक नंबर पत्राशेडपर्यंत गेली होती. नगरप्रदक्षिणेला निघालेल्या भाविकांच्या गर्दीने प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला होता. शिंगणापूर यात्रेला जाण्यापूर्वी चंद्रभागा नदीत सासनकाठ्यांना स्नान घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार अनेक भाविक सासनकाठ्यांना घेऊन यात्रेला रवाना झाले.

Web Title: pandharpur maharashtra news kamada ekadashi sohala