श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी 'टोकन'चा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌ तास रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून तिरुपतीप्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रा काळात भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. त्यासाठी मंदिर समितीने मागील वर्षीपासून ऑनलाइन दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. परंतु, ऑनलाइन बुकिंग न केलेल्या भाविकांना रांगेत उभे राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून मागील मंदिर समितीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर रुपये शुल्क आकारून तातडीच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठराव केला होता. परंतु, त्याला वारकरी संप्रदायातून विरोध झाल्याने तशी व्यवस्था कार्यान्वित होऊ शकली नाही.

दरम्यान, भाविकांना तिरुपतीच्या धर्तीवर टोकन देण्याची व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी तयार केला. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दर्शन व्यवस्थेसाठी तेली यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास दर्शनाचा धंदा बंद होण्यास मोठी मदत होणार आहे.

अशी असेल व्यवस्था
संबंधित भाविक काउंटरवर गेल्यानंतर त्याचे बोटाचे ठसे व छायाचित्र नोंदवून किती वेळानंतर दर्शन होईल, त्याची वेळ असलेले टोकन दोन मिनिटांत भाविकास दिले जाईल. दर्शनाची नेमकी वेळ समजल्याने रांगेत उभे राहण्याऐवजी संबंधित भाविक पंढरपूर शहरात फिरू शकेल. त्याला दिलेल्या वेळी मंदिरात जाऊन अवघ्या काही मिनिटांत त्याला दर्शन घेता येईल. तिरुपती व शिर्डी येथे अशी व्यवस्था आहे.

दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक भेट देणाऱ्या ठिकाणी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था केली जाते. पंढरपूरला एक कोटीहून अधिक लोक येत असल्याने केंद्राच्या त्या योजनाचा लाभ येथील प्रस्तावित व्यवस्थेसाठी घेण्यात येईल.
- संजय तेली, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती

Web Title: pandharpur maharashtra news token proposal for vittal darshan