दूधसंघाचे कौतुक जानकरांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पंढरपूर - दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेला दर मिळत नसतानाही दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मात्र जाहीर सभेत जिल्हा दूध संघ आजही प्रतिलिटर 27 रुपये दर देतो, असे सांगत जिल्हा दूध संघाचे कौतुक केले. दरम्यान, मंत्र्यांची भाषणबाजी लक्षात येताच सभेतील काही शेतकऱ्यांनी थेट व्यासपीठाजवळ येत कमी दराची बिले दाखवत भरसभेत मंत्री जानकरांनाच कमी दर देत असल्याचा जाब विचाराला. या प्रकारानंतर सावरासावर करीत संबंधितांशी बोलून पाहतो, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्पांतर्गत गुरुवारी येथील दाते मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय पशुपालक मेळाव्याचे आयोजन केले होते. मंत्री जानकरांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. दुग्धविकास मंत्री जानकर यांनी राज्य सरकाराच्या शेतकरी हिताच्या अनेक निर्णयाची माहिती सांगितली, तसेच सरकारचा आरे संघ व सोलापूर जिल्हा दूध संघ हे दोनच संघ शेतकऱ्यांना सर्वाधिक 27 रुपये प्रतिलिटर दर देत असल्याचे सांगत भरसभेत जिल्हा दूध संघाचे कौतुक केले. त्यांचे हे कोडकौतुक काही शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी भरसभेत कमी दराची बिले मंत्र्यांना दाखवत दूधदराचा जाब विचारला.

उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी साहेबराव जगदाळे यांनी अनेक खासगी दूध संस्था शेतकऱ्यांना कमी दर देत शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा सवाल उपस्थित केला. मंत्री म्हणून तुम्ही कधी लक्ष घालणार, असा थेट सावलही त्यांनी विचारला. या प्रकारामुळे सभा स्तब्ध झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सभेत उठलेल्या शेतकऱ्यांना जागेवरती नेले. सभेनंतरही अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा दूध संघाकडून कमी दर दिला जात असल्याच्या तक्रारींचा पाढाच जानकरांपुढे वाचला.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील अनेक जिल्हा दूध संघांशी संलग्न असलेल्या प्राथमिक दूध संस्थांच्या अध्यक्षांनी कमी प्रतीचे दूध दाखवून दरात कपात केल्याचे सांगितले. राजकीय फायदा उठविण्याच्या नादात वस्तुस्थिती सोडून भाषण केल्यामुळे जानकरांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

पंढरपुरी म्हशीचे संशोधन केंद्र उभारणार
पंढरपुरी म्हैस ही देशात प्रसिद्ध आहे. या जातिवंत म्हशीची पैदास वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पंढरपूर म्हैस पैदास संशोधन केंद्र सोलापूर जिल्ह्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा मंत्री महादेव जानकर यांनी या वेळी सभेत बोलताना केली.

Web Title: pandharpur news milk organisation mahadev jankar