श्री विठ्ठल सशुल्क दर्शनाला विरोध, दर्शनाचा बाजार मांडू नका...

pandharpur vitthal rukmini
pandharpur vitthal rukmini

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या ऑन लाईन दर्शनाच्या आणि तातडीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्या संदर्भात मंदिर समितीने केलेल्या ठरावाची बातमी आज (बुधवार) "सकाळ" मध्ये प्रसिध्द झाल्यावर वारकरी व महाराज मंडळींनी या ठरावाची अंमलबजावणी करण्यास विरोध दर्शवला आहे. विठूरायाच्या दर्शनाचा बाजार मांडू नका, अशा शब्दात भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान, आज मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी देखील फेब्रुवारी मध्ये झालेला हा ठराव अयोग्य असून त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही असे आज "सकाळ" शी बोलताना स्पष्ट केले.

दरवर्षी सुमारे अडीच लाख भाविक ऑन लाईन बुकींग करुन आणि कोणाचा तरी वशिला लावून तातडीचे दर्शन घेतात. सध्या ऑन लाईन बुकींगसाठी शुल्क नाही. तसेच वशिल्याने दर्शनाला जाणाऱ्यांकडून देखील मंदिर समितीला देणगी मिळत नाही. या दोन्ही पध्दतीच्या दर्शनास शंभर रुपये देणगी शुल्क आकारणी केल्यास सुमारे अडीच कोटी रुपये या माध्यमातून समितीला मिळतील. रिसतर शंभर रुपयांची पावती केल्यानंतर ज्यांना गडबड आहे असे लोक काही मिनिटात दर्शन करुन जाऊ शकतील या विचाराने श्री.रणजीतकुमार हे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती असताना फेब्रुवारी महिन्यात शंभर रुपये शुल्क आकारणीचा ठराव मंजूर करुन तो विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. आज "सकाळ" मध्ये या विषयीची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर शुल्क आकारणीच्या ठरावाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर "सकाळ" शी बोलताना म्हणाले, पैसे घेऊन तातडीने दर्शन देण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेण्यात आला होता. त्यावेळी विरोध झाल्याने तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. मंदिर समितीने वारकऱ्यांना वेगाने दर्शन व्हावे यासाठी अभ्यास करुन पर्यायी योजना केल्या पाहिजेत. तिरुपती प्रमाणे भाविकांना ठराव वेळ देऊन त्यावेळी दर्शनाला जाण्याची व्यवस्था केल्यास भाविकांना रांगेत उभे रहावे लागणार नाही. पैसे घेऊन दर्शन देण्याची व्यवस्था आम्हाला मान्य नाही. तथापी नूतन समितीने या ठरावाची अंमलबजावणी केल्यास आमचा तीव्र विरोध राहील.

वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर म्हणाले, यापूर्वी ही शंभर रुपये शुल्क घेऊन झटपट दर्शन व्यवस्था करण्याचा प्रयत्न काही वर्षापूर्वी झाला होता. त्यावेळीही आमचा विरोध होता आणि आताही अशा पैसे घेऊन दर्शन देण्याच्या व्यवस्थेला आमचा तीव्र विरोध राहणार आहे.मंदिर समितीने पैसे घेऊन दर्शन देण्याची व्यवस्था करुन दर्शनाचा बाजार मांडू नये. ज्यांना गडबड आहे अशा भाविकांनी मुखदर्शन अथवा मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन जावे. आता पर्यंत मंदिर समितीने केवळ भाविकांकडून देणगी गोळा करण्याचे काम केलेले नाही. भाविकांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. ऑन लाईन दर्शन बुकींग व्यवस्थेच्या माध्यमातून मर्यादीत लोक दर्शन घेतात. ऑन लाईन बुकींगसाठी पैसे आकारणी केली जाणार नाही असे ती व्यवस्था सुरु करताना आम्हाला सांगितले गेले होते. त्यामुळे आम्ही ऑन लाईन बुकींग दर्शन व्यवस्थेला विरोध केला नाही असे श्री.जळगावकर यांनी नमूद केले.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता "सकाळ" शी बोलताना ते म्हणाले, श्री विठ्ठल हा गोरगरीबांचा देव आहे. देवाच्या दर्शनासाठी पैशाची आकारणी करणे अजिबात योग्य नाही. या पूर्वीचे जिल्हाधिकारी श्री.रणजीतकुमार यांनी जरी ऑन लाईन आणि तातडीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क घेण्याचा ठराव केलेला असला तरी आपण या ठरावाची अंमलबजावणी होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. भाविकांना जास्तीतजास्त सुलभ दर्शन आणि सुविधा देण्यासाठी नवीन समिती निश्‍चितपणे प्रयत्न करेल. सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी समजावून घेऊन आवश्‍यक सुधारणा केल्या जातील. शुक्रवार (ता.21) रोजी होणाऱ्या नूतन समितीच्या पहिल्या बैठकीत आपण आपली भूमिका मांडणार असून सदस्य, वारकरी मंडळी अशा सर्वांना सोबत घेऊन समितीच्या माध्यमातून चांगले काम केले जाईल असे श्री.भोसले यांनी नमूद केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com