Maharashtra Tourism Festival : पन्हाळा आणि वाई महोत्सव लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

र्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. 
 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वाई महोत्सव आणि कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित पन्हाळा महोत्सव काही दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये २० ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. 

Wai Ghat and Temples, Satara | HHI Blog
सातारा जिल्ह्यामध्ये वाई महोत्सव आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा महोत्सव आयोजित करण्यात येणार होता. २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत तीनदिवसीय सांस्कृतिक, खाद्य महोत्सव, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, बचत गट स्टॉल, लोकसंगीत, पोवाडे, लावणी कार्यक्रम, सायकल, मॅरेथॉन स्पर्धा, मर्दानी खेळ कार्यक्रम, भव्य चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, पन्हाळगड मशालींच्या प्रकाशात पाहणे आदी मनोरंजन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. मुख्य आकर्षणामध्ये कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा- पांढरा रस्सा यांचा आस्वाद असा हा महोत्सव होता. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत, असे प्रादेशिक व्यवस्थापक हरणे यांनी सांगितले. 

जुन्नर महोत्सवाला पर्यटकांचा प्रतिसाद 
महोत्सवांतर्गत पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला. जुन्नर पर्यटन विकास संस्था, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामविकास आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने आयोजित महोत्सवास पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गिब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हाणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट, जुन्नर आठवडे बाजार भेट, कॅम्प फायर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhala and Wai festival postponed Maharashtra Tourism