
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंचा थेट फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या, "मठातला एखादा माणूस…''
भाजप नेत्या पंकजा मुंडे २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
"कार्यकर्त्यांनो कामाला लागा. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ," असं थेट आव्हान पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं आहे.
पुढे बोलताना पंकडा मुंडे म्हणाल्या की, "मुंडे साहेबांसारखं करणं, त्यांची कॉपी करणे, यामुळे कोणीही मुंडे होत नाही. तर त्यांच्या विचाराचे अनुकरण करून वागणं म्हणजे मुंडे साहेब आहे," असं म्हणत नाव न घेता भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी पंकजा मुंडे यांनी गहिनीनाथ गडावर गेलेलल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोला लगावला आहे. "मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोकं जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही, लोक हे त्याच्या जवळ येऊ शकत नाहीत. कारण त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, " अशा शब्दात पंकजा मुंडेंनी फडणवीसांवर सडकून टीका केली.
तसेच निवडणुकाच होईना. नगरपालिका होत नाही, जिल्हा परिषद होत नाहीत, मात्र ग्रामपंचायत होत आहेत. मला असं वाटतंय गावागावात युद्ध तयार झालंय, मात्र पुढे नाही, असं म्हणत निवडणुकांवरून पंकजा मुंडे यांनी भाजपला देखील आता घरचाच आहेर दिला आहे.