Pankaja Munde : कार्यकर्ता ओरडून म्हणाला पक्ष स्थापन करा; पंकजांच्या उत्तराने राज्याच्या राजकारणात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

Pankaja Munde : कार्यकर्ता ओरडून म्हणाला पक्ष स्थापन करा; पंकजांच्या उत्तराने राज्याच्या राजकारणात खळबळ

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पक्ष सोडणार, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. आज त्या भूमिका जाहीर करतील असं बोललं जात होतं. त्यावर पंकजा मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज बीडच्या परळीत गोपीनाथ गड येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये राहणार की नाही, याबद्दल थेटपणे भाष्य केलं होतं.

पंकजा यांचं भाषण सुरु असतांना एक कार्यकर्ता उठला आणि पक्ष स्थापन करा, अशी मागणी करु लागला. यानंतर पंकजा मुंडे यांनी निर्णय घेण्यासाठी मला आडपडद्याची गरज नसल्याचं सांगून मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

'निर्णय घेछण्यासाठी मला आडपडद्याची गरज नाही. मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या सगळ्या घटनांशी मुक्त चर्चा करेन. त्यांना विचारणार आहे की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, याची स्पष्टता आल्याशिवाय मला पुढे लोकांना विश्वास बांधून देता येणार नाही. त्यानंतर काय होईल ते असंच मंचावर सांगेन' असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

त्यामुळे आता पंकजा मुंडे ह्या आता निर्णायक भूमिकेवर पोहोचल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्याऐवढा मोठा नेता नसल्याचंही सांगून चर्चेला तोंड फोडलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा?

पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूमिका या समाजहिताच्या घ्यायच्या असतात. सगळ्यांना आवडणाऱ्या भूमिका घेणारा व्यक्ती एखाद्या वेळेस आमदारकी, खासदारकी किंवा मंत्रिपद मिळवू शकतो, पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाही. मला परळीतून पराभव स्वीकारावा लागला.

मला असं काही मिळालं नाही, तर मग मी काय करायला पाहिजे? तर माझी खरी भूमिका निभावली पाहिजे. मला जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुडे अशीच तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुमच्या समोर बिनधास्त भूमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवण्याएवढे खांदे मला अजून तरी मिळाले नाहीत. मात्र माझ्या खांद्याची रूंदी इतकी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :BjpPankaja Munde