
Nitin Gadkari : पंकजा-प्रितम यांना प्रचंड यश मिळेल; फडणवीसांच्या अनुपस्थितीत गडकरींचा विश्वास
नाशिकः आज नाशिकच्या सिन्नर तालुक्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्व. मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, पंकजा आणि प्रितम यांच्यावर जनतेचं प्रेम आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा घेऊन त्या काम करत आहेत. त्यांना येणाऱ्या काळात प्रचंड यश मिळेल. त्यांना हवं ते नक्की मिळेल, अशा शब्दांत गडकरींनी विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निमंत्रित नव्हते. त्यांच्या अनुपस्थिती झालेल्या या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्या भविष्याबद्दल व्यक्त केलेल्या विश्वासामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
भाजप हा खऱ्या अर्थाने महाजन-मुंडेंमुळे उभा राहिला. स्व. गोपीनाथरावांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्यासाठी आयुष्य वेचलं. ते एका जातीचे नव्हते. सर्वांसाठीच त्यांनी आवाज उठवला. आज नाशिकमध्ये त्यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होतंय, ही अभिमानाची बाब आहे.
'स्व. गोपीनाथराव यांच्या स्मृतीला मी हात जोडून वंदन करतो. पुतळा जसा महत्त्वाचा आहे तसेच व्यक्तीचा विचारदेखील महत्त्वाचा आहे. त्यांनी उभा केलेला उपेक्षितांचा लढा पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या पुढे नेत आहेत, त्यांना यश मिळेल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.